Suryakumar Yadav Kuldeep Video Viral: भारताने टी-२० विश्वचषक गट टप्प्यात पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव केला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने एकतर्फी विजय नोंदवला. वर्ल्डकपमधील पाकिस्तानविरूद्ध भारताचा हा आठवा विजय होता. पाकिस्तानला पराभूत करत भारताने सुपर-८ फेरीत धडक मारली. भारताच्या पाकिस्तानविरूद्ध विजयानंतर हार्दिक पंड्या व सूर्यकुमार यादव कुलदीप यादववर संतापले होते. पण सूर्या मैदानाबाहेर कुलदीपला कसं मनवत होता, याचा व्हीडिओ त्याने शेअर केला आहे.
पाकिस्तानचा बाद होणारा उस्मान तारिक हा शेवटचा फलंदाज होता. हार्दिक पंड्याने त्याला १८व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर झेलबाद केलं. यासह पाकिस्तान ऑल आऊट झाला. सामन झाल्यानंतर हार्दिक पंड्या, कुलदीप यादववर संतापला होता. व्हिडिओमध्ये हावभाव करून संभाषण होत असल्याचं दिसून आलं, तर तिलक वर्मा देखील तिथे होता. रिंकू सिंगने परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला.
हार्दिकनंतर संघाशी हँडशेक करताना कर्णधार सूर्यकुमार यादवदेखील कुलदीपवर डोळे वटारत त्याला काहीतरी बोलताना दिसला. ज्याचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ही घटना पाहिल्यानंतर लगेचच चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की भारतीय संघात काही गडबड आहे का?
मैदानावरील वादानंतर सूर्याने कुलदीपबरोबर VIDEO शेअर करत चर्चांना दिला पूर्णविराम
आज म्हणजेच १६ फेब्रुवारीला कर्णधार सूर्यकुमार यादवने इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सूर्यकुमार यादव व कुलदीप यादव दिसत आहेत. या व्हीडिओला सूर्याने “राग सोड ना भाऊ” असं कॅप्शन दिलं आहे. तर हेरा फेरीमधील डायलॉग या व्हीडिओमध्ये ऐकू येत आहेत. सूर्या व कुलदीप ज्याप्रमाणे हँडशेक करत असताना कर्णधार त्याच्यावर संतापला होता, तीच घटना या व्हीडिओमध्ये रिक्रिएट केली आहे.
चाहत्यांनी या व्हीडिओला ड्रेसिंग रूम बॉन्डिंग म्हटलं आणि सूर्याने ही रील शेअर करून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मैदानावर घडणाऱ्या गोष्टी या मैदानावरच सोडून देत संघ पुढे आल्याचं या व्हीडिओमधून सांगण्यात येत आहे. पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर टीम इंडिया कोलंबोहून भारतात परतली आहे आणि आता त्यांचा पुढचा सामना नेदरलँड्सविरुद्ध असेल.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात १८व्या षटकात कुलदीप यादवने हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर सीमारेषेवर उस्मान तारिकचा झेल सोडला होता, ज्यामुळे हे सर्व प्रकरण घडलं होतं. त्याचं खराब क्षेत्ररक्षण पाहून हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव खूप संतापलेले होते. सामना संपल्यानंतर, जेव्हा सूर्या संघातील खेळाडूंशी हँडशेक करत होता, तेव्हा तो कुलदीपला फटकारताना दिसला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. त्यामुळे सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी सूर्याने सोशल मीडियावर एक रील शेअर केला.

