८ मार्च २०२६ म्हणजे दोन महिन्यांपूर्वी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने घरच्या मैदानावर टी२० वर्ल्डकप जिंकला. २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघाचा भाग असणाऱ्या सूर्यकुमारने नेतृत्वगुण सिद्ध केले आणि भारताने टी२० जेतेपद आपल्याकडेच राखलं. दोन महिन्यांनंतर सूर्यकुमार यादवला भारतीय टी२० संघाच्या कर्णधारपदावरून बाजूला करण्यात आलं आहे. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची संघातही निवड करण्यात आलेली नाही. दोन वर्ल्डकपविजेत्या संघाचा भाग असलेला खेळाडू अवघ्या काही महिन्यात कर्णधार आणि खेळाडू नकोसा होणं अजब आहे. सूर्यकुमारची कारकीर्द खाचखळग्यांनी भरलेली आहे.
डोमेस्टिक क्रिकेटमध्ये दशकभर खेळल्यानंतर ३०व्या वर्षी सूर्यकुमारने भारतासाठी पदार्पण केलं. त्यावेळी सूर्यकुमारच्या बाबांचा किस्सा चर्चेत आला होता. ‘ज्या ज्या वेळी भारतीय संघाची एखाद्या मालिकेसाठी घोषणा होत असे तेव्हा बाबा सगळ्या वेबसाईट्स वाचून काढत. माझं नाव निवडलेल्या संघात नाही हे समजल्यावर ते मला कॉल करत. त्यांना आणि मला वाईट वाटत असे पण हरकत नाही, कधीतरी निवड होईलच असं मी सांगत असे’, असं सूर्यकुमारने सांगितलं होतं.
टी२० प्रकारात पदार्पण करताना इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरच्या वेगवान चेंडूवर नटराज शॉट खेळत सूर्यकुमारने षटकार लगावून सुरुवात केली होती. अक्रॉस जाऊन फाईनलेग क्षेत्रात चेंडू भिरकावून देण्याची त्याची शैली अर्थात सुपला शॉट प्रचंड लोकप्रिय झाला. अवघ्या वर्षभरात ३१व्या वर्षी सूर्यकुमारने टी२० प्रकारात शतक झळकावलं.
३२व्या वर्षी सातत्यपूर्ण खेळासह त्याने आयसीसीच्या जागतिक टी२० क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली. टी२० क्रमवारीत ९०० गुणांची कमाई करणारा तो पहिला खेळाडू ठरला होता. त्यावर्षी आयसीसीच्या वर्षातील सर्वोत्कृष्ट टी२० खेळाडू म्हणून त्याची निवड झाली होती.
पुढच्या वर्षी पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट टी२० खेळाडू म्हणून त्याची निवड झाली. २०२४ टी२० वर्ल्डकप फायनलमध्ये सूर्यकुमारने डेव्हिड मिलरचा अफलातून असा झेल टिपला होता. वर्ल्डकपविजेत्या संघाचा तो अविभाज्य भाग होता. ३३व्या वर्षी सूर्यकुमारची टी२० संघाच्या कर्णधारपदी निवड झाली.
३४व्या वर्षी सूर्यकुमारच्या नेतृत्वातच भारताने आशिया चषकाच्या जेतेपदावर नाव कोरलं. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दुरावलेल्या संबंधामुळे आशिया चषकात वातावरण संवेदनशील होतं. भारतीय संघाने पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते जेतेपदाचा करंडक स्वीकारण्यास भारताने नकार दिला. भारतीय संघ जेतेपदाविना माघारी परतला होता. सूर्यकुमारने या सगळ्या परिस्थितीत चांगलं नेतृत्व केलं होतं.
३५व्या वर्षी सूर्यकुमारच्या नेतृत्वात भारतीय संघाने टी२० वर्ल्डकपच्या जेतेपदावर कब्जा केला. वर्ल्डकपमध्ये अमेरिकेविरुद्धच्या सलामीच्या लढतीत सूर्यकुमारने नाबाद ८४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. मात्र त्यानंतर त्याच्या बॅटमधून निघणाऱ्या धावा आटल्या. टी२० वर्ल्डकपनंतर झालेल्या आयपीएल स्पर्धेतही सूर्यकुमारची बॅट तळपलीच नाही. यंदा आयपीएलमध्ये सूर्यकुमारने १३ सामन्यात मिळून २७० धावा केल्या. मुंबई इंडियन्सची कामगिरी यथातथाच राहिली. संघातील वरिष्ठ खेळाडू म्हणून सूर्यकुमारकडून मोठ्या खेळींची अपेक्षा होती. मात्र त्याला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही.
भारतासाठी टी२० प्रकारात, ११३ सामन्यात सूर्यकुमारच्या नावावर ३२७२ धावा आहेत. १६२च्या स्ट्राईकरेटने खेळताना त्याने ४ शतकं आणि २५ अर्धशतकं झळकावली आहेत. टी२० प्रकारात कर्णधार म्हणून सू्र्यकुमारची कामगिरी दमदार अशीच आहे. ५२ सामन्यात सूर्यकुमारने भारतीय संघाचं नेतृत्व केलं. यापैकी ४० मध्ये संघाने विजय मिळवला. केवळ ८ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. २ सामने टाय झाले.
सूर्यकुमारचा वारसदार असलेल्या श्रेयसची कर्णधार आणि फलंदाज म्हणून कामगिरी दिमाखदार अशीच आहे. भविष्याचा विचार करून आम्ही हा निर्णय घेत आहोत. टी२० वर्ल्डकपविजेत्या कर्णधाराला संघातून वगळणं सोपं नाही. सूर्यकुमारची कामगिरी वाखाखण्याजोगी आहे. मात्र आता आम्ही पुढचा विचार करून संघनिवड केली आहे असं निवडसमितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी सांगितलं.
दरम्यान नवा कर्णधार आणि संघनिवडीनंतर सूर्यकुमारने पोस्ट शेअर केली आहे. अतिशय कौशल्यपूर्ण आणि दमदार कामगिरीसाठी सज्ज संघाला नव्या मोहिमेसाठी शुभेच्छा अशा शब्दांत सूर्यकुमारने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
