Suryakumar Yadav Dance Video: भारतीय टी-२० संघाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील फायनलमध्ये न्यूझीलंडला पराभूत करुन जेतेपदाचा मान पटकावला होता. हे भारताचा लागोपाठ दुसरा टी-२० वर्ल्डकप विजय होता. पण ही स्पर्धा झाल्यानंतर त्याला कर्णधारपदावरुन काढून टाकण्यात आलं आणि संघाबाहेर देखील करण्यात आलं. आता त्याने पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी कंबर कसली आहे. दरम्यान सूर्याने मुंबईत झालेल्या प्रो गोविंदाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान त्याने केलेल्या भन्नाट डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

भारताचा वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार सूर्यकुमार यादवची प्रो गोविंदा २०२६ स्पर्धेसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली होती. गुरुवारी या स्पर्धेतील अंतिम फेरीचा थरार रंगला. यादरम्यान सूर्यकुमार यादवने देखील हजेरी लावली होती. दरम्यान सूर्याने आपल्या हटके स्टाईलमध्ये एन्ट्री केली. एन्ट्रीच्या वेळी तो घेऊन टाक या गाण्यावर मल्हारी गाण्याची डान्स स्टेप करताना दिसला. त्यानंतर सूर्याने गोविंदांची भेट देखील घेतली. सूर्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न सुरू

यादरम्यान सूर्याला भारतीय संघात पुनरागमन करण्याबाबतही प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी प्रश्नाचं उत्तर देताना सूर्या म्हणाला, “हे बघा, मी तर पूर्ण मेहनत करतोय. जर सर्वकाही चांगलं झालं, तर चांगलंच होईल.” सूर्यकुमार यादवने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत कर्णधार म्हणून दमदार कामगिरी केली होती. पण फलंदाज म्हणून तो आपली छाप सोडू शकला नव्हता. त्याने या स्पर्धेतील ९ सामन्यातील ९ डावांत फलंदाजी करताना २४२ धावा केल्या होत्या. अमेरिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात जेव्हा इतर सर्व फलंदाज फ्लॉप ठरले होते, त्यावेळी सूर्यकुमार यादवने एकाकी झुंज देत अर्धशतकी खेळी केली होती. पण इतर सामन्यांमध्ये त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. स्पर्धेतील अंतिम सामन्यातही तो शून्यावर माघारी परतला होता.

केवळ टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नव्हे, तर आयपीएल स्पर्धेतही त्याचा फ्लॉप शो पाहायला मिळाला होता. या हंगामात त्याला काही सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करण्याची संधी देखील मिळाली होती. पण फलंदाजीत त्याचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. या हंगामातील १३ सामन्यांमध्ये फलंदाजी करताना त्याने अवघ्या २०.७६ च्या सरासरीने २७० धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने २ अर्धशतकं झळकावले होते.