Ind vs Eng : दुसऱ्या वनडेमध्ये सूर्यकुमार यादवला मिळणार संधी? श्रेयस अय्यर झाला जायबंदी

पुण्यात शुक्रवारी भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना

(संग्रहित छायाचित्र)

टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर इंग्लंडविरोधात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात जायबंदी झाला, त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं. क्षेत्ररक्षण करताना श्रेयसच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली.

इंग्लंडच्या संघाची फलंदाजी सुरू असताना आठव्या षटकात शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर इंग्लंडच्या जॉनी बेयरस्टोने मारलेला शॉट अडवताना श्रेयस अय्यरच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. त्यानंतर श्रेयसला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून तो उर्वरित सामन्यात सहभागी होऊ शकणार नाही अशी माहिती बीसीसीआयने दिली. नंतर श्रेयसच्या जागी शुबमन गिल मैदानावर आला.

आणखी वाचा- जायबंदी झाल्यामुळे हा ‘कॅप्टन’ IPL ला मुकणार?, संघाला मोठा धक्का

आता शुक्रवारी भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना होणार आहे. या सामन्याआधी श्रेयस अय्यर फिट न झाल्यास भारतीय संघव्यवस्थापनाकडून सूर्यकुमार यादवला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यातही पदार्पणाची संधी मिळू शकते. खांद्यांच्या हाडाला झालेली दुखापत ठिक होण्यास जवळपास सहा आठवड्यांचा वेळ लागतो. शिवाय सर्जरी झाली तर त्यापेक्षाही जास्त कालावधी लागतो. सध्या श्रेयसच्या प्रकृतीविषयी माहिती मिळालेली नाही, पण त्याची दुखापत गंभीर असल्यास शुक्रवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात तो खेळणार नाही. त्यामुळे टी-२० मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादवला चौथ्या क्रमांकावर संधी मिळू शकते.

आणखी वाचा- Ind vs Eng : हार्दिकला मिठी मारताच ढसाढसा रडला कृणाल, वडिलांच्या आठवणीने झाला भावुक

दुसरीकडे, पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यरसोबतच भारताचा सलामीवीर रोहित शर्माही जायबंदी झाला. डावाच्या पाचव्या षटकात उजव्या हाताच्या कोपरावर मार्क वूडचा चेंडू लागल्याने तो जखमी झाला. तरीही त्याने मैदान सोडलं नाही, आणि संघासाठी २८ धावांचं योगदान दिलं. रोहितच्या जागी सूर्यकुमार यादव क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला होता. आता उर्वरित 2 सामन्यांपर्यंत जर दोन्ही खेळाडूंची प्रकृती सुधारली नाही तर दोघंही एकदिवसीय मालिकेतून बाहेर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, असं झाल्यास हा भारतीय संघासाठी मोठा धक्का ठरू शकतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Suryakumar yadav may get chance in remaining matches india vs england odi series as shreyas iyer got shoulder injury sas