श्रेयस अय्यरकडे भारताच्या टी-२० संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं, तेव्हा त्याच्याकडून संघाला नव्या उंचीवर नेण्याची अपेक्षा होती. मात्र, सूर्यकुमार यादवकडून कर्णधारपदाची धुरा स्वीकारल्यानंतर भारताची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकांमध्ये टीम इंडियाला मोठ्या पराभवांना सामोरं जावं लागलं आहे. यानंतर आता टी-20 विश्वचषक विजेता कर्णधार सूर्यकुमार यादवचं संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे.

भारताने आतापर्यंत खेळलेल्या सात सामन्यांपैकी सहा सामन्यांत पराभव स्वीकारला असून, एक सामना पावसामुळे रद्द झाला. या निराशाजनक कामगिरीनंतर श्रेयस अय्यर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. दरम्यान, एका नव्या अहवालानुसार, बीसीसीआय टी-२० विश्वचषक विजेता कर्णधार सूर्यकुमार यादवला पुन्हा टी-२० संघाचं नेतृत्व देण्याच्या पर्यायावर गंभीरपणे विचार करत आहे.

टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर लगेचच सूर्यकुमार यादवकडून भारताचं टी-२० कर्णधारपद काढून घेण्यात आलं होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधील खराब फॉर्ममुळे हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर बीसीसीआयने नेतृत्वाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे सोपवली. मात्र, आता सूर्यकुमारच्या पुनरागमनाची शक्यता अद्याप कायम असल्याचं समोर आलं आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीच्या आधारे सूर्यकुमारच्या पुनरागमनाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितलं की, सूर्यकुमारला कायमस्वरूपी बाजूला करण्यात आलेलं नाही आणि तो पुन्हा निवडीसाठी पात्र आहे. “सूर्यकुमार यादवसाठी भारतीय संघाचे दरवाजे अजूनही खुले आहेत. सध्या तो आमच्या योजनांचा भाग नाही. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने सातत्याने धावा केल्या, तर त्याच्या निवडीचा निश्चितच विचार केला जाईल,” अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली.

३५ वर्षीय सूर्यकुमार यादवने भारताला २०२६ च्या टी-२० विश्वचषकाचं विजेतेपद मिळवून दिलं होतं. मात्र, फलंदाजीत दीर्घकाळ सातत्याने अपयश आल्यामुळे त्याच्याकडून टी-२० कर्णधारपद काढून घेण्यात आलं. त्यानंतर आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठीच्या टी-२० संघातूनही त्याला वगळण्यात आलं. आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना सूर्यकुमारची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. तसेच टी-२० विश्वचषकातही अमेरिकेविरुद्धच्या सलामीच्या सामन्याव्यतिरिक्त त्याला मोठी खेळी करता आली नाही.

कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवच्या भारतीय संघातील अनुपस्थितीमुळे संघाला चांगलाच फटका बसला. युरोप दौऱ्यातील टी-२० मालिकेत भारतीय संघ पूर्णपणे अपयशी ठरला. लाजिरवाणी बाब म्हणजे आयर्लंड आणि इंग्लंड अशा दोन्ही मालिकेत भारताला एकही सामना जिंकता आलेला नाही. दोन्ही मालिकांमध्ये टीम इंडियाला व्हाईटवॉश दिला. याशिवाय ४ वर्षांहून अधिक काळ आयसीसीच्या क्रमवारीतील टी-२०मधील वर्ल्ड नंबर वनचा किताब संघाने गमावला.