Suryakumar Yadav Viral Video: भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. रांचीत पार पडलेल्या या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाकडून संजू सॅमसन, इशान किशन आणि तिलक वर्मा यांनी दमदार खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने २४९ धावांपर्यंत मजल मारली. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने ९ चेंडू राखून विजय मिळवला. दरम्यान भारताचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव देखील हा सामना पाहत होता. सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा शेट्टीने एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो सध्या तुफान व्हायरल होतोय.
काही महिन्यांपूर्वीच सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकला होता. पण वर्ल्डकप जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवला कर्णधार पदावरून काढून टाकलं आणि संघाबाहेर केलं. त्यामुळे वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
सूर्यकुमार यादवचा व्हिडीओ होतोय व्हायरल
देविशा शेट्टीने सूर्यकुमार यादवचा दुसरा टी-२० सामना पाहत असल्याचा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सूर्यकुमार यादव गोलंदाजीचा प्लॅन सांगताना दिसून येत आहे. सुरुवातीला देविशा व्हिडीओमध्ये म्हणते की, सूर्यकुमार यादव एकटाच बडबड करत होता. त्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला, “अजूनही ५ षटकं शिल्लक आहेत. कुलदीप आणि अक्षर सामना फिरवू शकतात. एक षटक टाकेल गुड्डू ( कुलदीप), एक षटक टाकेल अक्षर, एक षटक टाकेल पाजी (अर्शदीप), एक षटक टाकेल मयंक यादव आणि शेवटचं षटक टाकेल शिवम दुबे.”
पण भारतीय संघाला हा सामना ९ चेंडू शिल्लक ठेवून गमवावा लागला आहे. २५० धावांचा पाठलाग करताना शे होप आणि रुदरफोर्डने दमदार फलंदाजी केली. शे होपमी शेवटपर्यंत फलंदाजी करून नाबाद १०२ धावा केल्या. तर शेरफेन रुदरफोर्डने ८४ धावा केल्या. रोमारियो शेफर्डने ३४ धावा केल्या. वेस्ट इंडिजने हा सामना ६ गडी राखून आपल्या नावावर केला आणि मालिका १-१ ने बरोबरीत आणली. वेस्ट इंडिजने भारतीय संघाविरुद्ध खेळताना सर्वात मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला आहे.
