Suryakumar Yadav Gesture Wins Heart Video: भारताचा टी-२० विश्वचषक विजेता कर्णधार व मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने मैदानाबाहेरही त्याच्या कृतीने सर्वांची मनं जिंकली. आहेत. आयपीएल २०२६ दरम्यान वानखेडे स्टेडियममध्ये भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू व प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या नावाच्या स्टँडचं अनावरण करण्यात आलं, या कार्यक्रमासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, रवी शास्त्री आणि सूर्यकुमार यादव उपस्थित होते. यादरम्यान सूर्याचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.

मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलमधील पुढील सामना वानखेडेच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. मुंबई इंडियन्स १२ एप्रिलला संध्याकाळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरूद्ध भिडणार आहे. या हायव्होल्टेज सामन्यात रो-को एकमेकांविरूद्ध खेळताना दिसणार आहेत. मुंबईने आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांपैकी पहिला सामना जिंकला आहे. त्यानंतरचे दोन सामने गमावले आहेत. तर आरसीबीने सुरूवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत आणि संघाचा तिसरा सामना राजस्थान रॉयल्सविरूद्ध आज शुक्रवारी होणार आहे.

सूर्यकुमार यादवचा व्हायरल व्हीडिओ गुरूवारी झालेल्या कार्यक्रमातील आहे. त्या वेळी सूर्यकुमार यादव वानखेडे स्टेडियममध्ये नव्याने नाव देण्यात आलेल्या ‘रवी शास्त्री स्टँड’च्या उद्घाटनासाठी उपस्थित होता. भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या भारतीय क्रिकेटमधील महत्त्वपूर्ण योगदानाचा सन्मान म्हणून या स्टँडला त्यांचे नाव देण्यात आले. हा कार्यक्रम मुंबई आणि त्यांच्या क्रिकेट दिग्गजांमधील घट्ट नात्याचा उत्सव होता.

कॅमेरामन सूर्यकुमार यादवचा फोटो काढताना तोल जाऊन पडला, भारताच्या टी-२० संघाच्या कर्णधाराने हे पाहताच तात्काळ पुढे येत त्याला मदत केली आणि त्याला उठून उभं राहण्यात मदत केली. तो सुरक्षित असल्याची खात्री करून घेत सूर्या पुढे निघाला. सूर्यकुमारच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक झालं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठं स्थान मिळूनही त्याची नम्र व साधी वृत्ती अधोरेखित झाली.

मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित या समारंभाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच क्रिकेट विश्वातील अनेक मान्यवर उपस्थित होते. ‘रवी शास्त्री स्टँड’सोबतच, मुंबई क्रिकेट असोसिएशनने स्टेडियममधील काही प्रवेशद्वारांना मुंबईतील दिग्गज क्रिकेटपटू डायना इडलडी, एकनाथ सोलकर आणि दिलीप सरदेसाई यांची नावं देण्याची घोषणा केली. त्यांच्या मुंबई आणि भारतीय क्रिकेटमधील मोलाच्या योगदानाचा सन्मान म्हणून हा निर्णय घेण्यात आला.