Suryakumar Yadav On Sanju Samson: आयसीसी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत कोलकाताच्या इडन गार्डनच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा होता. या महत्वाच्या सामन्यात संजू सॅमसन शेवटपर्यंत खंबीर उभा राहिला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिजने १९५ धावा केल्या होत्या. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १९६ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसनने ९७ धावांची खेळी करून भारतीय संघाला विजय मिळवून दिला. या विजयानंतर बोलताना कर्णधार सूर्यकुमार यादवने संजू सॅमसनचं कौतुक केलं आहे.
सामना झाल्यानंतर बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला, “हा सामना आमच्यासाठी क्वार्टर फायनलसारखा होता. ज्याप्रकारे मुलांनी खेळ केला ते खरोखरच कौतुकास्पद आहे. मी नेहमी म्हणतो की, जे लोकं संयम ठेवतात आणि वाट पाहतात त्यांच्यासोबत चांगल्याच गोष्टी घडतात. तो (संजू) जेव्हा संघात नव्हता, त्यावेळी त्याने प्रचंड मेहनत घेतली होती. त्याने घेतलेल्या अफाट मेहनतीचे फळ त्याला आज मिळाले आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला, “जेव्हा दबाव नसतो तेव्हा काहीच नसतं. पण इथे आम्हाला दडपण जाणवतंय. पोटात गोळे येत आहेत. पण तुम्ही हे दडपण कसं हाताळता यालाच महत्व असतं.”
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिजने २० षटकात ४ गडी बाद १९५ धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेसने सर्वाधिक ४० धावांची खेळी केली. तर जेसन होल्डरने नाबाद ३७ धावांची खेळी केली. धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसनने सर्वाधिक ९७ धावांची खेळी केली. तर तिलक वर्माने २७ धावा केल्या. संजू सॅमसनचं शतक थोडक्यात हुकलं, पण त्याने भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
संजू सॅमसनची निर्णायक खेळी
भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १९६ धावांचा डोंगर सर करायचा होता. त्यामुळे एका फलंदाजाकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. अशा स्थितीत संजूने पुढाकार घेतला. सलामीला आलेला संजू शेवटपर्यंत उभा राहिला. त्याने ५० चेंडूत नाबाद ९७ धावा केल्या. यादरम्यान त्याने १२ चौकार आणि ४ षटकार खेचले.
