चेन्नईत तामिळनाडूविरुद्धच्या रणजी सामन्यात फक्त तीन दिवसांत मुंबईने एक डाव आणि ४४ धावांनी पराभव पत्करला. मुंबई क्रिकेटच्या आजपर्यंतच्या इतिहासात रणजी क्रिकेट स्पध्रेत चौथ्यांदा मुंबईवर डावाने पराभवाची नामुष्की ओढवली. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून सूर्यकुमार यादवने मुंबईचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नेतृत्वाची धुरा यष्टिरक्षक-फलंदाज आदित्य तरेकडे सोपवण्यात आली आहे.
तरेकडून या हंगामात पुरेशा धावा झालेल्या नाहीत. नऊ डावांमध्ये त्याने फक्त १९९ धावा केल्या आहेत. परंतु तरीही संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने तरेवर विश्वास प्रकट केला आहे. यादवने चालू हंगामात दोन शतकांसह ५३.८८च्या सरासरीने ४८५ धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यरनंतर मुंबईकडून दुसऱ्या क्रमांकाच्या एकूण धावा यादवने केल्या आहेत.
मुंबईचा स्थानिक हंगाम खराब चालू असताना यादवचा कर्णधारपदाचा राजीनामा अनपेक्षित मानला जात आहे. मैदानावर आणि ड्रेसिंग रूममध्ये काही खेळाडूंविरोधात यादवने अर्वाच्य भाषा वापरल्याची तक्रार मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे आली होती. त्यामुळे यादवला कर्णधारपद सोडण्यास भाग पाडण्यात आले का, हीसुद्धा चर्चा क्रिकेटवर्तुळात जोरात रंगत आहे. परंतु एकीकडे मुंबईच्या संघाचे रणजी स्पध्रेतून आव्हान संपुष्टात होण्याची चिन्हे असताना नवा कर्णधार नेमावा लागत आहे.
रणजीच्या ‘अ’ गटात मुंबईचा संघ सहाव्या स्थानावर असून, सहा सामन्यांत त्यांच्या खात्यावर ११ गुण जमा आहेत. आतापर्यंत मुंबईने उत्तर प्रदेशविरुद्धचा फक्त एकमेव सामना जिंकला आहे. आता रणजी स्पध्रेत मुंबईचे फक्त दोन सामने बडोदा आणि गतविजेत्या कर्नाटकविरुद्ध होणार आहेत. वेगवान गोलंदाज झहीर खान आणि शैलीदार फलंदाज रोहित शर्माच्या अनुपस्थितीत यंदाच्या हंगामात मुंबईच्या नेतृत्वाची धुरा यादवकडे सोपवण्यात आली होती. मागील हंगामात झहीर खेळू न शकलेल्या सामन्यांत अभिषेक नायरकडे कर्णधारपद देण्यात आले होते.