नवी दिल्ली : भारतीय संघाला ट्वेन्टी-२० विश्वविजेतेपद मिळवून दिल्यानंतर पुढच्याच मालिकेसाठी मला कर्णधारपदावरून हटवले जाईल आणि संघातूनही वगळले जाईल, अशी कल्पनाही केली नव्हती. माझ्यासाठी हा निश्चितच मोठा धक्का होता. मात्र, मी निवड समितीच्या निर्णयाचा आदर केला, अशी भावना सूर्यकुमार यादवने व्यक्त केली.
सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारताच्या ट्वेन्टी-२० संघाने शानदार कामगिरी करताना ५२ पैकी ४२ सामन्यांत विजय मिळवले. दोन वर्षांच्या कालावधीत भारताने एकही मालिका गमावली नाही. आशिया चषक आणि ट्वेन्टी-२० विश्वचषकावरही भारताने नाव कोरले. त्यामुळे पुढील दोन वर्षे संघाची धुरा आपल्याकडेच असेल, अशी सूर्यकुमारची अपेक्षा होती. २०२८ मधील ऑलिम्पिक स्पर्धा, त्यानंतरचा ट्वेन्टी-२० विश्वचषक आणि पुढील आव्हानांसाठी संघाची बांधणी करण्याचा विचार तो करत होता. मात्र, निवड समितीने वेगळा निर्णय घेत श्रेयस अय्यरकडे ट्वेन्टी-२० संघाचे नेतृत्व सोपवले आणि ३५ वर्षीय सूर्यकुमारला संघातूनही वगळले.
‘‘इंग्लंड आणि आयर्लंड मालिकेसाठी संघ जाहीर होण्याच्या दोन-तीन दिवस आधी मला फोन आला. ‘आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. तुझ्या दृष्टीने सगळे कसे सुरू आहे? तुला ‘आयपीएल’मध्ये काय घडले ते आणि त्यानंतरची कामगिरी माहीत आहेच,’ असे त्यांनी सांगितले. मी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तो माझा स्वभाव नाही. संघाच्या हिताचा विचार करून निर्णय घेण्यात आला असेल असे मला वाटले. मी त्यांच्या निर्णयाचा आदर केला,’’ असे सूर्यकुमारने माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
‘‘प्रत्यक्ष संघ जाहीर झाला, तेव्हा त्यात माझे नाव नाही हे पाहिल्यावर मी हसलो. दबावाच्या परिस्थितीत किंवा गोष्टी मनासारख्या घडत नसतील, तेव्हा मी नेहमी हसत परिस्थिती स्वीकारण्याचा प्रयत्न करतो,’’ असे सूर्यकुमारने नमूद केले.
श्रेयसबाबत कटुता नाही
तसेच श्रेयस अय्यरच्या निवडीबाबत आपल्या मनात कोणतीही कटुता नसल्याचेही त्याने स्पष्ट केले. ‘‘मी श्रेयसबरोबर खूप क्रिकेट खेळलो आहे. तो उत्तम खेळाडू, उत्तम माणूस आणि उत्तम कर्णधारही आहे. त्यामुळे त्याची कर्णधारपदी निवड झाली याबद्दल मला अजिबात वाईट वाटले नाही,’’ असे त्याने सांगितले.
अत्यंत कठीण काळ
संघातून वगळल्यानंतरचा काळ सूर्यकुमारसाठी अत्यंत कठीण ठरला. जवळपास ४०-५० दिवस तो घरीच होता. ‘‘मी काहीच करत नव्हतो. मला मोठा धक्का बसला होता. आता काय करायचे? क्रिकेट खेळायचे की नाही? असे अनेक प्रश्न मनात होते,’’ असे त्याने सांगितले. मात्र, या काळात त्याच्या पत्नीने त्याला क्रिकेटशी असलेले जुने नाते आठवून दिले. ‘‘२० वर्षांपूर्वी तू क्रिकेट का खेळायला सुरुवात केलीस, कारण तुझे या खेळावर प्रेम होते. पुन्हा तेच प्रेम आणि तीच जिद्द घेऊन खेळ,’’ असा सल्ला तिने दिला.
कामगिरीत घसरण
सूर्यकुमार कर्णधार म्हणून सातत्याने यश मिळवत होता, पण फलंदाजीत त्याच्याकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही. २०२४ च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर ४२ डावांत त्याला केवळ ९३२ धावा करता आल्या. यात त्याची सरासरी २५.८८ अशी होती. या वर्षीच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातही त्याने निराशाच केली. त्यानंतर ‘आयपीएल’मध्ये १३ सामन्यांत तो केवळ दोन अर्धशतके आणि २०.७६च्या सरासरीनेच धावा करू शकला. त्यामुळे निवड समितीने कठोर निर्णय घेताना त्याला संघातून वगळले.
