टी२० प्रकारात सव्वा वर्षाचा अर्धशतकाचा दुष्काळ संपवत कर्णधार सूर्यकुमार यादवने कर्णधाराला साजेशी खेळी करत भारतीय संघाच्या न्यूझीलंडविरुद्ध विजयात सिंहाचा वाटा उचलला. रायपूर इथे झालेल्या धावांच्या मैफलीत न्यूझीलंडने भारतीय संघाला २०९ धावांचं आव्हान दिलं. डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात डळमळीत झाली. मत्र त्यानंतर इशान किशनने मनमुराद फटकेबाजी करत दडपण बाजूला सारलं. इशान बाद झाल्यानंतर सूर्यकुमारने सूत्रधाराची भूमिका स्वीकारून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारतीय संघाने ७ विकेट्स आणि २८ चेंडू राखत दणदणीत विजय मिळवला.
सूर्यकुमारने ३७ चेंडूत ८७ धावांची खेळी करत पुढच्या महिन्यात होणाऱ्या टी२० वर्ल्डकपसाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं. या विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. पुढचा सामना २५ जानेवारीला गुवाहाटी इथे होणार आहे.
न्यूझीलंडसाठी डेव्हॉन कॉनवे आणि टीम सैफर्ट यांनी ४३ धावांची वेगवान सलामी दिली. मात्र त्यानंतर हर्षित राणाने कॉनवेला बाद करत ही जोडी फोडली. कॉनवेने १९ धावा केल्या. वरुण चक्रवर्तीने सैफर्टचा अडथळा दूर केला. यानंतर रचीन रवींद्र आणि ग्लेन फिलीप्स यांनी जोरदार फटकेबाजी सुरू केली. टी२० प्रकारात धावांसाठी झगडणाऱ्या रवींद्रने खणखणीत फटके खेळायला सुरुवात केली. ही जोडी मोठ्या धावसंख्येचा पाया रचणार असं वाटत असतानाच कुलदीप यादवने धोकादायक फिलीप्सला बाद केलं. त्याने १९ धावा केल्या. फिलीप्सच्या जागी आलेल्या मिचेलने रवींद्रला साथ दिली. शिवम दुबेच्या फसव्या स्लोअरवनवर मिचेलला बाद केलं. पाठोपाठ कुलदीपनेच रचीनला बाद करत न्यूझीलंडला अडचणीत टाकलं. त्याने २६ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह ४४ धावांची खेळी केली. एकाक्षणी न्यूझीलंडचा संघ अडीचशेचा टप्पा सहजी पार करेल असं वाटत होतं. मात्र कुलदीपने भारताला पुनरागमनची संधी दिली. मार्क चॅपमनही मोठी खेळी करू शकला नाही. कर्णधार मिचेल सँटनरने २७ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ४७ धावांची खेळी केली. झॅक फोक्सने नाबाद १५ धावांची खेळी करत कर्णधाराला चांगली साथ दिली. न्यूझीलंडने २०८ धावांची मजल मारली. भारतातर्फे कुलदीपने २ तर हार्दिक पंड्या, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताला अभिषेक शर्माकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र जेकब डफीने अभिषेकला बाद करत न्यूझीलंडला मोठं यश मिळवून दिलं. अनुभवी मॉट हेन्रीने संजू सॅमसनला रवींद्रकडे झेल देण्यास भाग पाडलं. ६/२ अशी अवस्था झालेल्या भारतीय संघाला इशान किशन आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी संकटातून बाहेर काढलं. आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्ससाठी एकत्र खेळण्याचा अनुभव असलेल्या या दोघांनी सुरेख भागीदारी साकारली. इशान किशनने न्यूझीलंडच्या प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेत चौफेर फटकेबाजी केली. अभिषेक शर्मा ज्या पद्धतीने एकटाकी सामना जिंकून देतो त्या धर्तीवर इशानने वादळी खेळी साकारत विजयाचा पाया रचला. इश सोधीच्या फिरकीने इशानला चकवलं. मात्र त्याआधी त्याने ३२ चेंडूत ११ चौकार आणि ४ षटकारांसह ७६ धावांची वेगवान खेळी केली. इशान आणि सूर्यकुमार जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ४९ चेंडूत १२२ धावांची भागीदारी केली.
इशान बाद होताच कर्णधार सूर्यकुमारने सगळी सूत्रं हाती घेतली. धावांसाठी संघर्ष करणाऱ्या सूर्यकुमारने २३ इनिंग्जनंतर अर्धशतकाला गवसणी घातली. १२ ऑक्टोबर २०२४ रोजी सूर्यकुमारने बांगलादेशविरुद्ध ७५ धावांची खेळी साकारली होती. सुपला फटक्यासह ठेवणीतले खास फटक्यांची पोतडी उघडत सूर्यकुमारने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना निष्प्रभ केलं. सूर्यकुमारला अनेकदा फॉर्मसाठी विचारण्यात आलं होतं. माझा सराव चांगला सुरू आहे. धावा होत नाहीयेत पण काळजी करण्याची आवश्यकता नाही असं सूर्यकुमारने म्हटलं होतं. सूर्यकुमारने ३७ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ८७ धावांची तडाखेबंद खेळी साकारली. इशान बाद झाल्यानंतर शिवम दुबेने सूर्यकुमारला तोलामोलाची साथ दिली. त्याने १८ चेंडूत ३६ धावा केल्या. या जोडीने ३७ चेंडूत ८१ धावा चोपल्या.
