Suryakumar Yadav Reveals Wife Question: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने टी-२० विश्वचषक २०२६चं जेतेपद पटकावलं. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली भारताच्या टी-२० संघाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सूर्यकुमार यादवला भारतीय संघात पदार्पणाची संधी फार उशिरा मिळाली. सूर्या ३० वर्षांचा असताना त्याने २०२१मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करूनही सूर्याला संघात संधी मिळत नव्हती. पण २०१८ मध्ये त्याच्या पत्नीने विचारलेल्या एका प्रश्नाने त्याच्या आयुष्याला कलाटणी दिली.
भारताचा विश्वविजेता कर्णधार, सूर्यकुमार यादवने १४ मार्च २०२१ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्या दिवशी त्याने बिलकुल कल्पनाही केली नसेल की, पुढच्या पाच वर्षांत तो भारताचा विश्वविजेता कर्णधार बनेल. भारतासाठी पदार्पण करण्यापूर्वी सूर्याचा प्रवास खडतर होता. सातत्याने चांगली कामगिरी करूनही त्याला ओळख मिळत नव्हती. त्याने त्या काळातील एक प्रसंग सांगितला, जेव्हा त्याची पत्नी देविशा शेट्टीच्या एका प्रश्नाने त्याचं आयुष्य बदलून टाकलं.
सूर्यकुमार यादवला त्याच्या पत्नीने कोणता प्रश्न विचारला होता?
पीटीआयला दिलेल्या एका पॉडकास्टमध्ये सूर्यकुमार यादव म्हणाला, “२०१६ मध्ये आमचं लग्न झालं, तेव्हा मी केकेआरकडून खेळत होतो. सगळं काही सुरळीत चाललं होतं. मी चांगला खेळत होतो आणि मजेत होतो, पण २०१८ मध्ये तिने मला विचारलं, ‘तुझ्या वयोगटातील संघसहकारी भारतासाठी खेळत आहेत. तू याबद्दल काय विचार करतोस?”
सूर्यकुमार यादवने या प्रश्नावर उत्तर देत पुढे सांगितलं की, “मी म्हणालो, ‘मलाही भारतासाठी खेळायचं आहे.’ त्यावर तिने विचारलं, ‘तू कसा खेळणार?'” सूर्याने कबूल केलं की या प्रश्नाने त्याचं आयुष्य बदलून टाकलं. यामुळे त्याची दैनंदिन दिनचर्येपासून सर्व काही बदललं. मात्र, सूर्याने स्पष्ट केलं की हा त्याच्या पत्नीसोबतचा वाद नव्हता, तर ती चर्चा होती.
सूर्या म्हणाला, “तो वाद नव्हता, पुढे कसं जायचं याबद्दलची ती केवळ एक चर्चा होती. जर मला भारतासाठी खेळायचं असेल आणि जिंकायचं असेल, तर मला काय करावं लागेल, ही सर्व चर्चा होती. तो क्षण माझ्यासाठी निर्णायक होता. त्यानंतर आम्हाला आहार, मित्रमंडळी, शनिवार-रविवार अशा अनेक गोष्टीत मोठे बदल करावे लागले. आम्ही सोमवार ते शुक्रवार याला नोकरीसारखंच वागत होतो.”
सूर्याच्या शिस्तीचे फळ त्याला २०१८, २०१९ आणि २०२० च्या आयपीएलमधील त्याच्या प्रभावी कामगिरीच्या रूपात मिळालं. यामुळे त्याला २०२१ मध्ये भारतासाठी पदार्पण करण्याची संधीही मिळाली. कर्णधार म्हणाला की, पडद्यामागे देविशा हीच त्याची ताकद राहिली. सूर्याने पत्नीला क्रेडिट देत म्हटलं, “तिने मला खरं सांगून माझ्यावर खूप मोठा प्रभाव टाकला आहे. तुमची जोडीदार तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणेच सांगते, कारण तिला फक्त तुमची प्रगती हवी असते. जर तुम्हाला एकत्र पुढे जायचं असेल, तर तुमच्या संवादात प्रामाणिकपणा असणं अत्यावश्यक आहे.”
सूर्या म्हणाला की, देविशाने त्याच्या क्रिकेटमध्ये कधीही हस्तक्षेप केला नाही, कारण ते तिचं क्षेत्र नव्हतं, पण तिने त्याला क्रिकेटपलीकडच्या आयुष्याबद्दल कायम सल्ला दिला. “मी तिला याचे पूर्ण श्रेय देतो, कारण तिने मला केवळ माझ्या क्रिकेट कारकिर्दीबद्दलच नाही, तर आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टींबद्दलही सल्ला दिला. मी काय करावं, एखादी विशिष्ट परिस्थिती कशी हाताळावी. याबाबत ती नकळत चर्चा करायची.”
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तिने मला घरात येण्यापूर्वी क्रिकेट दाराबाहेरच ठेवायला सांगितल्याचं सूर्याने म्हटलं. घरी तो सुपरस्टार सूर्यकुमार यादव नसून, केवळ सूर्या आहे. “तिने मला घरात क्रिकेट आणू नकोस असं सांगितलं. या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी मी शिकलो. तुम्ही कितीही यश मिळवलं तरी नम्र राहिलं पाहिजे आणि तुमचे पाय हे नेहमी जमिनीवर ठेवले पाहिजेत. घरी तुम्ही सूर्यकुमार यादव नाही, त्याप्रमाणे वाग. जेवण झाल्यावर तुमचं ताट डिशवॉशरमध्ये ठेवणं. या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या असतात.”
सूर्यकुमार यादव व देविशा शेट्टी लग्नाच्या १० वर्षांनंतर आता आई-बाबा होणार आहेत. सूर्या किंवा देविशाने याबद्दल माहिती दिली नसली तरी देविशाच्या डोहाळेजेवणाचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यामुळे टी-२० वर्ल्डकप विजयानंतर अजून एक मोठा आनंद सूर्याच्या जीवनात येणार आहे.
