Suryakumar Yadav reveals secret Indian Cricket Team superstition: खेळातही अनेकदा अंधश्रद्धा पाहायला मिळतात. क्रिकेट सारख्या खेळात अनेक खेळाडूंनी वेगवेगळ्या अंधश्रद्धा पाळल्या होत्या. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर पॅड घालताना पहिल्यांदा डाव्या पायत घालत असे. तसेच महत्त्वाच्या क्षणी क्रिकेट मॅच पाहण्याचे टाळत असे. १९८३ चा विश्वचषक विजेता कर्णधार भगवान शिवाचे पेंडट असलेली चैन घालत असे. अशा अनेक अंधश्रद्धा क्रिकेटमध्ये काही खेळाडू पाळत असतात. नुकत्याच संपन्न झालेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्येही अशा काही घटना घडल्या आहेत.

भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला. या स्पर्धेत सेमी फायनल आणि फायनल सामन्यापूर्वी भारतालाही अंधश्रद्धेचा लाभ झाल्याचे सूर्यकुमारने सांगितले आहे.

द इंडियन एक्सप्रेसशी बोलत असताना सूर्यकुमार यादवने विश्वचषकाशी निगडित अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. इंग्लंडबरोबर सेमी फायनलचा सामना खेळण्यापूर्वी भारतीय संघाने हॉटेल बदलले होते, असे सूर्यकुमारने सांगितले. जिंकण्याची एकही शक्यता आम्हाला सोडायची नव्हती, असाही खुलासा त्याने केला.

सूर्यकुमारने सांगितले की, आम्ही सेमी फायनलचा सामना खेळण्यासाठी वानखेडेवर जात होतो. त्यावेळी विमानात आम्हाला कुणीतरी सुचवले की, आम्ही हॉटेल बदलायला हवे. अनेक टीम्सने पूर्वी असे केलेले आहे. आम्हाला विजयाच्या शक्यतेजवळ नेणारी एकही गोष्ट मागे सोडायची नव्हती. त्यामुळे असे करून कुणी जिंकले असेल तर तसे करू, असा विचार आम्ही केला.

सेमी फायनलच्या उत्कंठा वर्धक सामन्यात भारताने इंग्लंडचा सात धावांनी पराभव केला होता. या सामन्यात संजू सॅमसन आणि जसप्रीत बुमराहने अतिशय महत्त्वाचे योगदान दिले होते. तर इंग्लंडकडून जेकब बेथलने शतकी खेळी करत इंग्लंडला विजयाच्या समीप नेले. मात्र सामना जिंकण्यात इंग्लंडला अपयश आले.

ग्रहणामुळे सरावाचा वेळ बदलला

मुंबईत सेमीफायनलच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाने चंद्र ग्रहणामुळे सरावाच्या सेशनचा वेळही बदलला होता, अशीही माहिती समोर येत आहे. चंद्रग्रहणाच्या वेळी केली जाणारी कामे अशुभ मानन्यात येतात. द इंडियन एक्सप्रेसला सूत्रांनी सांगितले की, इंग्लंडविरुद्ध सेमी फायनलचा सामना खेळत असताना भारतीय संघातील खेळाडूंना सकारात्मक सुरुवात करायची होती. त्यामुळे अनेकांनी चंद्रग्रहणानंतर सराव सुरू करण्याची मागणी केली. त्यानुसार संघ व्यवस्थापनाने ही मागणी मान्य करत सराव सेशन तासाभराने पुढे ढकलले.