Suryakumar Yadav Reveals MS Dhoni Advice For T20 WC: कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियाने विक्रमी तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाचं जेतेपद पटकावलं. टीम इंडियाचा अंतिम सामना पाहण्यासाठी भारताचे दोन्ही दिग्गज खेळाडू रोहित शर्मा व एम एस धोनी यांनी हजेरी लावली होती. फायनलपूर्वी रोहित व धोनीने एकत्र टी-२० विश्वचषकाची ट्रॉफी मैदानावर आणली होती. धोनीने भारताच्या विजयानंतर खास पोस्ट शेअर करत संघाचं कौतुक केलं होतं. आता कर्णधार सूर्याने धोनीची भेट विश्वचषकापूर्वी घेतल्याचा खुलासा केला.

सूर्यकुमार यादवने मंगळवारी मोठा खुलासा केला. स्पर्धेपूर्वी त्याने एम एस धोनीची भेट घेऊन महत्त्वाचा सल्ला घेतल्याचं त्यांनी सांगितलं. भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावलं. या विजयासह सूर्या आता त्या मोजक्या भारतीय कर्णधारांच्या यादीत सामील झाला आहे ज्यांनी संघाला वर्ल्डकप जिंकून दिला आहे.

यापूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने २०२४ मध्ये आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला होता. तर एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ मध्ये टी-२० वर्ल्डकप आणि २०११चा वनडे वर्ल्डकप जिंकला होता. याशिवाय कपिल यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९८३मध्ये पहिल्यांदा वनडे वर्ल्डकप जिंकत इतिहास घडवला होता.

भारताच्या दिग्गज कर्णधारांच्या यादीत नाव जोडल्याबद्दल सूर्या म्हणाला, “या महान खेळाडूंच्या यादीत नाव येणं खूप खास आहे. हळूहळू मला त्या भावनेची जाणीव होत आहे. पुढेही असंच खेळत भारताला आणखी ट्रॉफी जिंकून देण्याचा माझा प्रयत्न असेल.”

धोनीने टी-२० विश्वचषकापूर्वी टीम इंडिया आणि कॅप्टनला काय सल्ला दिला होता?

यादरम्यान धोनीसंबंधित प्रश्न विचारताच सूर्या म्हणाला, “स्पर्धेआधी मी धोनीला भेटलो होतो. तेव्हा त्यांनी मला आयसीसी स्पर्धेकडे कसं पाहायचं आणि कसा दृष्टिकोन ठेवायचा याबाबत मार्गदर्शन केलं. त्यांनी सांगितलं की आपल्याकडे खूप चांगला संघ आहे, फक्त धैर्याने खेळा आणि आपण नक्की जिंकू. वर्ल्डकप जिंकल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया देखील खूप खास होती.”

सूर्यकुमार यादवने दरम्यान भारताच्या यशस्वी मोहिमेबाबत आणि पुढील लक्ष्याबाबतही भाष्य केलं. “२०२४ आणि २०२६ असे सलग दोन वर्ल्डकप जिंकणं खूप छान वाटत आहे. ही खरोखरच खास भावना आहे. २०२४ मध्ये जेव्हा आम्ही वर्ल्डकप जिंकलो, तेव्हा २०२६ मध्ये घरच्या मैदानावर पुन्हा अशीच कामगिरी करण्याचं स्वप्न होतं. आता पुढील लक्ष्य २०२८ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचं आहे. संघ सध्या चांगल्या लयीत आहे. जर त्या वर्षी भारताने पुन्हा टी-२० वर्ल्डकप जिंकला, तर ते आणखी खास ठरेल,” असं सूर्या म्हणाला. २०२८ मध्ये ऑलिम्पिक २०२८ अमेरिकेतील लॉस एंजेलेस येथे होणार आहेत.