India vs South Africa 2nd T20I: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये झालेल्या ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला ५१ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघासमोर विजयासाठी २१४ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा संपूर्ण डाव अवघ्या १६२ धावांवर आटोपला. यासह दक्षिण आफ्रिकेने ही मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे. दरम्यान या पराभवानंतर बोलताना सूर्यकुमार यादव काय म्हणाला? जाणून घ्या.

या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार शुबमन गिल यांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. त्यामुळे भारताला या सामन्यात हवी तशी सुरुवात मिळाली नाही. दरम्यान सूर्यकुमार यादवने चांगली सुरुवात न मिळाल्याने पराभव झाल्याचे कबूल केले आहे. सामन्यानंतर बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला, “मला वाटतं, मी आणि शुभमनने चांगली सुरुवात करायला हवी होती. कारण नेहमी अभिषेकवर अवलंबून राहू शकत नाही. तो ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे, ते पाहता त्याचा कधीतरी खराब दिवस येऊ शकतो. मी, शुबमन आणि इतर फलंदाजांनी जबाबदारी घ्यायला हवी होती.”

तसेच तो पुढे म्हणाला, “माझ्या मते, या धावांचा यशस्वी पाठलाग करता आला असता. पण ठीक आहे, शुबमन गिल पहिल्याच चेंडूवर बाद झाला. पण हो, मी ती जबाबदारी घ्यायला हवी होती आणि आणखी थोडा वेळ फलंदाजी करायला हवी होती. पण आम्ही शिकतोय, पुढच्या सामन्यात नक्कीच चांगली कामगिरी करू.”

या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी २१४ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सलामीला आलेला शुबमन गिल शून्यावर माघारी परतला. तर अभिषेक शर्मा १७ धावांवर माघारी परतला. अक्षर पटेलने २१ धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादव अवघ्या ५ धावांवर माघारी परतला. भारताकडून तिलक वर्माने सर्वाधिक ६२ धावांची खेळी केली.