Suryakumar Yadav Statement on India win: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियाने टी-२० विश्वचषक २०२६ मधील आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. टीम इंडियाने नामिबियाचा ९३ धावांनी पराभव करत टी-२० वर्ल्डकपमधील मोठी विजय नोंदवला. या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी आक्रमक सुरूवात करत मोठी धावसंख्या उभारली. तर दुसऱ्या डावात टीम इंडियाचे गोलंदाज गेमचेंजर ठरले. भारतीय संघाच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर कर्णधार सूर्यकुमार यादव काय म्हणाला, जाणून घेऊया.
भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना २०९ धावांचा डोंगर उभारला. संजू सॅमसन व इशान किशन यांनी संघाला आक्रमक सुरूवात करून दिली. यासह टीम इंडियाने पॉवरप्लेमध्ये ८६ धावा करत सर्वात मोठी धावसंख्या उभारली. तर फक्त ७ षटकांत १०० धावांचा पल्ला पार केला. यामध्ये संजू सॅमसन, इशान किशन व तिलकचं मोठं योगदान होतं. तर अखेरीस हार्दिक पंड्याने अर्धशतकी खेळी करत संघाला २०० धावांचा पल्ला पार करून दिला. तर गोलंदाजीत वरूणने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या आणि इतर सर्व गोलंदाजांनी विकेट्सला हातभार लावत नामिबियाला ११६ धावांवर सर्वबाद केलं.
सूर्यकुमार यादव भारताच्या सर्वात मोठ्या विजयानंतर काय म्हणाला?
भारताच्या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, “सगळ्यांसाठी हा खूप चांगला सामना होता. ही खेळपट्टी फलंदाजीसाठी सोपी नव्हती, पण इशान आणि संजू यांनी दिलेल्या आक्रमक सुरुवातीमुळे ती सोपी वाटू लागली. त्यानंतर दोन-तीन झटपट विकेट्स गेल्यानंतर शिवम आणि हार्दिक यांनी उभारलेली भागीदारी अत्यंत कौतुकास्पद होती.”
झटपट विकेट्स गेल्याबद्दल बोलताना सूर्या म्हणाला, “चेंडू थोडासा थांबून येत होता, मात्र नामिबियाच्या गोलंदाजांचं श्रेय घ्यायचं नाही. त्यांनी खूपच शिस्तबद्ध आणि आक्रमक गोलंदाजी केली. त्यांची योजना स्पष्ट होती आणि त्यांनी ती अचूक राबवली. त्यांची गोलंदाजी खरोखर प्रभावी होती. आम्ही मधल्या टप्प्यात काही विकेट्स गमावल्या, पण त्यानंतर चांगली भागीदारी झाली आणि शेवटही चांगलाच झाला.”
गोलंदाजी विभागाबद्दल बोलताना कर्णधार म्हणाला, “बुमराहने पूर्ण चार षटकं टाकली, हे संघासाठी मोठं सकारात्मक आहे. तो पुन्हा संघात परतला आहे आणि पुढील सामन्यासाठीही पूर्णपणे तयार आहे. तसेच वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी एकत्रितपणे केलेली गोलंदाजी ही प्रतिस्पर्ध्यांसाठी कठीण कॉम्बिनेशन ठरतं.”
“तो (हार्दिक) नव्या चेंडूपासून ते जुन्या चेंडूपर्यंत, तसेच डेथ ओव्हर्समध्येही प्रभावी गोलंदाजी करतो. त्याचबरोबर त्याची फलंदाजीही संघासाठी मोठा बूस्ट ठरते. अशा निर्णायक सामन्यात सकारात्मक मानसिकता ठेवत ‘सामनावीर’ पुरस्कार जिंकणं, ही संघासाठी खूप चांगली बाब आहे. आतापर्यंतचा संघाचा प्रवास समाधानकारक आहे. पुढील वाटचालीसाठी हेच अपेक्षित होतं. प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. सुरुवात थोडीशी ढासळलेली वाटली, पण आता आम्ही योग्य मार्गावर आहोत,” असं अखेरीस सूर्या म्हणाला.
भारताचा आता पुढील सामना रविवारी १५ फेब्रुवारीला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध होणार आहे. या सामन्याकरता टीम इंडिया श्रीलंकेला रवाना होईल आणि कोलंबोमध्ये हा सामना होणार आहे.

