Suryakumar Yadav BCCI Captaincy Removal Reaction: भारतीय संघाचा टी-२० विश्वचषक विजेता कर्णधार आणि विस्फोटक फलंदाज अशी ओळख मिळवलेला सूर्यकुमार यादव सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. भारताने त्याच्या नेतृत्त्वाखाली टी-२० विश्वचषक २०२५ जिंकल्यानंतर बीसीसीआयने मोठा निर्णय घेत त्याचं कर्णधारपद काढून घेत त्याला संघाबाहेर केलं. सर्व चाहत्यांसह स्वत: सूर्यकुमार यादवसाठीही हा मोठा धक्का होता. हा धक्का पचवल्यानंतर यादरम्यानचा वेळ सूर्यकुमार यादवने कसा घालवला, याचा खुलासा त्याने एका मुलाखतीत केला.
सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून काढल्यानंतर श्रेयस अय्यरला नेतृत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरची सुरूवात फार खराब झाली आणि त्याने आयर्लंड व इंग्लंडविरूद्ध टी-२० मालिका गमावली. यामुळे सूर्यकुमार यादवकडून नेतृत्त्वाची जबाबदारी काढून घेण्याच्या निर्णयावरून बीसीसीआयला चाहत्यांनी सुनावलं होतं.
सूर्यकुमार यादवसाठी संघातून ड्रॉप केल्यानंतर पहिली प्रतिक्रिया काय होती, याबाबत सांगताना तो म्हणाला, “मला हे एखाद्या चित्रपटासारखं वाटलं. पण मी जसं म्हटलं गोष्टी आपल्या हव्या तशा घडत नसतील तरी ठिके, काही हरकत नाही. तरीही मी या खेळाचा भाग आहे. अजूनही खेळण्याची सराव करण्याची संधी मिळतेय. मी तो निर्णय स्वीकारला. तुझं नाव तिथे नाहीय, तू संघाला वर्ल्डकप जिंकून दिल्यानंतर संघाचं नेतृत्त्व करत नाहीयेस पण मी त्या निर्णयानंतर माझ्यावर शंका घेतली,की असं कसं होऊ शकतं. असं कसं होऊ शकतं. त्यानंतर स्वत:लाच उत्तर मिळालं. पुढे जात राहा. ज्या गोष्टी तुझ्या नियंत्रणाबाहेर आहेत, त्यावर विचार करू नकोस. मला शक्य आहेत त्या सर्व गोष्टी मी केल्या. मी याच तत्त्वावर जगत आलो आहे.”
बीसीसीआयच्या या निर्णयानंतर सूर्यकुमार यादवने तो वेळ कसा घालवला, यावर तो म्हणाला, “पुढचे काही आठवडे खूप अवघड होते. त्यावेळी मी मुंबई टी-२० लीगमध्ये खेळत होतो. तिथून घरी परतल्यानंतर मी अक्षरशः घरातच बसून राहायचो. टीव्ही पाहणं, पत्नीसोबत गप्पा मारणं आणि घरातच वेळ घालवणं, असंच सुरू होतं. जवळपास पाच-सहा आठवडे मी अजिबात हालचाल केली नाही आणि सरावही केला नाही. पुढे नेमकं काय करायचं, याची मला कल्पनाच नव्हती. माझ्यासमोर कोणताच मार्ग नव्हता. आयपीएल, फ्रँचायझी क्रिकेट किंवा डॉमेस्टिकमध्येही टूर असतात, सामने असतात, हा सामना तो सामना…. त्यावेळेस माझ्यासमोर काहीच मार्ग दिसत नव्हता.”
“मग मी शांत बसलो, विचार केला. मी १० वर्षांपूर्वी यावेळेस काय करत होतो. मी जेव्हा भारतासाठी खेळत नव्हतो, तेव्हा मी आयपीएलनंतर काय करत होतो. मी कधी दोन-तीन आठवड्यांचा, तर कधी जास्तीत जास्त चार-पाच आठवड्यांचा ब्रेक घ्यायचो. एखाद्या सुट्टीवर जायचो, परत यायचो आणि मग पुन्हा सराव सुरू करायचो. मी तेव्हा असा पिरियड ऑफ सीझन समजायचो. मग आताही तेच का करू शकत नाही. पूर्वी जे करायचो तेच करायला काय हरकत आहे. मी क्लब क्रिकेट, कांगा लीग खेळायचो. असोसिएशन, क्लबमध्ये जाऊन खेळणं, १५-१७ वर्षांचा असताना जसा सराव करायचो, आयपीएलमध्ये, भारतासाठी खेळायचं आहे, या विचाराने जसा राहायचा, तसंच आयुष्य पुन्हा जगायला सुरू कर…. मुख्य म्हणजे जे घडलं आहे ते स्वीकारून आपली नेमकी भूमिका काय आहे समजून घेतलं, मी फलंदाज आहे, मला धावा करायला आवडतात, त्यासाठी मी काय करू शकतो, मला मेहनत करून सराव करून धावा करायच्या आहेत. घरी येऊन कुटुंबाबरोबर राहायचं आहे आणि आनंद घ्यायचा बस्स… बाकी सगळं होत राहिलं.” असं सूर्यकुमार यादवने पुढे सांगितलं.
