Suryakumar Yadav on India defeat: २०२६ च्या टी-२० विश्वचषकात टीम इंडियाला नकोसा पराभव पत्करावा लागला. स्पर्धेच्या सुपर ८ फेरीच्या पहिल्या सामन्यात गतविजेत्या भारताला दक्षिण आफ्रिकेने ७६ धावांनी पराभवाचा मोठा धक्का दिला आहे. अहमदाबादमधील या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने डेव्हिड मिलरच्या उत्कृष्ट अर्धशतकी खेळीच्या जोरावर १८७ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात भारतीय संघ धावा करण्यात अपयशी ठरला. यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव भारताच्या पराभवाबाबत काय म्हणाला, जाणून घेऊया.
भारताच्या सुपर-८ मधील या पराभवानंतर सेमीफायनलचं गणित अवघड झालं आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सुपर-८ सामन्यात टीम इंडियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी झाला, जिथे त्यांना १८८ धावांचं लक्ष्य देण्यात आलं होतं. पण या सामन्यात भारतीय संघ १८.५ षटकांत १११ धावांवर ऑलआउट झाला. भारताकडून फक्त शिवम दुबे ४२ धावांची खेळी केली. याशिवाय संघाचे इतर फलंदाज २० धावांचा आकडादेखील गाठू शकले नाहीत.
सूर्यकुमार यादव भारताच्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?
सामन्यानंतर बोलताना कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, “सामन्याची सुरुवात झाल्यापासून आम्ही नेहमीच सामन्यात होतो, असं मला वाटतं. सुरुवातीला आम्ही अतिशय चांगली गोलंदाजी केली आणि २१ धावांत त्यांचे ३ विकेट गडी बाद केले. मात्र ७ ते १५ षटकांदरम्यान त्यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत सामना पुन्हा आपल्या बाजूने वळवला. त्यानंतर आम्हीही पुन्हा पुनरागमन केलं. एकूण पाहता आमची गोलंदाजी चांगली झाली, पण फलंदाजीत थोडी सुधारणा करता आली असती.”
“१८०-१८५ धावांचा पाठलाग करताना तुम्ही पॉवरप्लेमध्ये सामना जिंकू शकत नाही, पण तिथे सामना नक्कीच गमावला जाऊ शकतो. आम्ही पॉवरप्लेमध्ये खूप विकेट्स गमावल्या. त्यानंतर १८०-१८५ धावांचा पाठलाग करताना आवश्यक असलेल्या छोट्या-छोट्या भागीदारी करू शकलो नाहीत. पण हा खेळाचा भाग आहे. आम्ही यातून शिकू, चर्चा करू आणि अधिक मजबूतपणे पुनरागमन करू,” असं सूर्या म्हणाला.
बुमराह अर्शदीपच्या गोलंदाजीबाबत बोलताना कर्णधार म्हणाला, “बुमराह आणि अर्शदीपची जोडी किती घातक आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. दोघांनीही एकत्रितपणे उत्तम कामगिरी केली आहे. आजही त्यांनी मिळून आठ षटकं टाकली, सुमारे पाच विकेट्स घेतल्या आणि जवळपास ४५-५० धावा दिल्या. मी आकडे लक्षात ठेवण्यामध्ये फारसा चांगला नाही, पण त्यांनी भागीदारीत अप्रतिम गोलंदाजी केली आणि आम्हाला त्यांच्याकडून हेच अपेक्षित आहे. दोघेही अनुभवी आहेत आणि संघात त्यांची उपस्थिती आमच्यासाठी महत्त्वाची आहे.”
पुढील सामन्यात काय चांगलं करण्याची गरज आहे, याबाबत बोलताना सूर्या म्हणाला, “झिम्बाब्वेविरुद्धच्या पुढील सामन्याबाबत बोलायचं झालं तर, आम्ही चांगली फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करण्यावर भर देऊ. आम्ही बेसिक गोष्टींकडे लक्ष देऊ आणि ज्या शैलीचं क्रिकेट आम्हाला खेळायचं आहे, त्यात कोणताही बदल करणार नाही. आम्ही नक्कीच जोरदार पुनरागमन करू.”
भारतीय संघ सुपर-८ मध्ये यानंतर झिम्बाब्वे व वेस्ट इंडिज या दोन संघांविरूद्ध भिडणार आहे. दुसरा सामना २६ फेब्रुवारीला चेन्नईमध्ये तर वेस्ट इंडिजविरूद्धचा सामना १ मार्चला ईडन गार्डन्सच्या मैदानावर खेळवला जाईल. भारताला सेमीफायनल गाठायची असेल तर हे दोन्ही सामने महत्त्वाचे असतील.
