Suryakumar Yadav Statement on India Series Win: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली भारताने टी-२० मालिका विजयाचा सिलसिला कायम ठेवला आहे. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पाचव्या टी-२० सामन्यात ३० धावांनी पराभव करत मालिका ३-१ ने आपल्या नावे केली आहे. संपूर्ण मालिकेत भारताच्या गोलंदाजी, फलंदाजी विभागाने चांगली कामगिरी केली. भारताच्या या मालिका विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव काय म्हणालाा, पाहूया.

भारतीय संघाने पहिला टी-२० सामना १०१ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. तर दुसऱ्या टी-२० सामन्यात ५० धावांनी पराभव पत्करावा लागला. यानंतर तिसऱ्या सामन्यात भारताने पुनरागमन करत ७ विकेट्सने विजय मिळवला. चौथा सामना लखनौमध्ये खूप धुकं असल्याने दृश्यमानता कमी होती आणि त्यामुळे रद्द करण्यात आला. तर अखेरचा टी-२० सामनाही भारताने ३० धावांनी जिंकत मालिका आपल्या नावे केली.

भारताच्या मालिकाविजयानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला, “मालिका सुरू झाल्यापासूनच आम्ही एका ठराविक पद्धतीने क्रिकेट खेळायचं ठरवलं होतं आणि तसंच खेळलो. वेगळं काही करण्याचा प्रयत्न केला नाही. सर्व विभागांमध्ये मोकळेपणाने खेळायचं हे ठरवलं होतं त्याचे निकाल सगळ्यांसमोर आहेत. फलंदाजीबाबत बोलताना म्हणाला, मागील काही मालिकांमध्ये हीच गोष्ट आमच्याकडून थोडी कमी पडत होती असं आम्हाला वाटत होतं. आम्हाला नेमकं असंच फलंदाजी करायचं होती, एकदा कुणी सेट झालं की न थांबता सातत्यपूर्ण आक्रमक फलंदाजी करायची. आजच्या सामन्यात फलंदाजीत ते दिसून आलं.

गोलंदाजीत बुमराहला पॉवरप्लेपेक्षा नंतरच्या षटकांध्ये गोलंदाजी देण्याबाबत तो म्हणाला, “हो, आम्ही काहीसं वेगळं करून पाहायचं ठरवलं होतं. पॉवरप्लेमध्ये बुमराहला एक षटक देणं, ड्रिंक्सनंतर मधल्या षटकांमध्ये धावांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याला आणणं आणि शेवटी डेथ ओव्हर्ससाठी त्याला तयार ठेवणं, अशी योजना होती. आज वॉशिंग्टनने सुरूवातीच्या षटकांमध्ये जबरदस्त कामगिरी करत जबाबदारी घेतली. काही क्षणी आम्ही दबावाखाली होतो, आव्हानंही आली, पण हा खेळ तुम्ही त्या परिस्थितीला कसा प्रतिसाद देता यावर अवलंबून असतो आणि सर्वांनी ते खूप छान हाताळलं.”

“तो कुठेतरी हरवला आहे…”, सूर्या खराब फॉर्मबाबत नेमकं काय म्हणाला?

स्वत:च्या फॉर्मचा उल्लेखही त्याने या बोलण्यात केला. “ही मालिका आव्हानात्मक होती, पण तितकीच उत्तमही ठरली. आम्ही जवळपास ठरवलेलं सगळं करण्याचा चांगला प्रयत्न केला आणि ते मिळवलंदेखील. कदाचित एकच गोष्ट जमली नाही, ‘फलंदाज सूर्यकुमार’ सापडला नाही! कदाचित तो कुठेतरी हरवला आहे. (हसत) पण तो नक्कीच अधिक ताकदीने परत येईल. या संघाचा कर्णधार म्हणून मी खूप समाधानी आहे. जेव्हा जेव्हा आम्ही अडचणीत होतो, तेव्हा कुणीतरी पुढे येऊन संघाला सावरलं. कर्णधार म्हणून हे पाहणं खूप समाधानकारक आहे,” असं अखेरीस कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला.