Suryakumar Yadav Statement on India Series Win: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने टी-२० मालिका विजयाची घोडदौड कायम ठेवली आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने २-१ असा विजय मिळवला. ब्रिस्बेनमधील अखेरचा टी-२० सामना पावसामुळे रद्द झाला. यासह सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली भारताने टी-२० मालिका जिंकली आहे.
पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला व अखेरचा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. यानंतर भारतीय संघाने पुनरागमन करत तिसरा व चौथा सामना जिंकत उत्कृष्ट कामगिरी केली आणि मालिकेत २-१ ने आघाडी मिळवला. अखेरचा सामना ५ षटकांचा झाल्यानंतर खराब हवामानामुळे सामना थांबवण्यात आला आणि सततच्या पावसामुळे सामना रद्द झाला.
कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, “कॅनबेरामधील सामना पूर्ण व्हावा अशी आमची इच्छा होती, पण ते आपल्या नियंत्रणात नव्हतं. मात्र, प्रत्येकाने ज्या पद्धतीने आपलं योगदान दिलं आणि ०-१ पिछाडीवरून ज्या पद्धतीने संघ परतला, त्याचं श्रेय सगळ्या खेळाडूंना जातं. बॅटिंग, बॉलिंग आणि फील्डिंग या तिन्ही विभागातील कामगिरी पाहता ही मालिका खूप चांगली झाली.”
भारताच्या टी-२० मालिका विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव काय म्हणाला?
“संघाचे वेगवान आणि फिरकी गोलंदाज दोघांनीही आपली भूमिका योग्यरितीने पार पाडली. बुमराह-अर्शदीप ही तर एक स्फोटक जोडगोळी आहे, आणि अक्षर, वरुण यांनी येऊन आपलं सर्वोत्तम देत संघाला मदत केली. वॉशिंग्टननंही शेवटच्या सामन्यात महत्त्वाचं योगदान दिलं. हे खेळाडू आता बरेच टी२० सामने खेळलेत त्यामुळे त्यांच्याकडे अनुभव आहे आणि आत्मविश्वासही…”, असं कर्णधार म्हणाला.
टी-२० विश्वचषकासाठी संघ निवड करणं ही मोठी डोकेदुखी असेल यावर उत्तर देताना सूर्या म्हणाला, “ही खरंतर चांगली डोकेदुखी आहे. कारण सध्या अनेक खेळाडू सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. ऑस्ट्रेलियानंतर आता पुढे दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड अशा बलाढ्य संघांविरुद्ध सामने आहेत, हे वर्ल्डकपपूर्वीचं परफेक्ट बिल्ड-अप ठरेल.”
टी-२० विश्वचषक गतविजेता संघ म्हणून घरच्या मैदानावर पुढील वर्ल्डकप खेळायचा आहे, यावर बोलताना कॅप्टन सूर्या म्हणाला, “अलीकडे मी पाहिलं की महिला संघानं भारतात वर्ल्डकप जिंकला आणि प्रेक्षकांचा अविश्वसनीय पाठिंबा त्यांना मिळाला. घरच्या मैदानावर खेळताना दडपण नक्की असतं, पण त्याचबरोबर ती एक मोठी जबाबदारी आणि उत्साहाचं कारणही असतं.”
भारतात जिथे जिथे संघ खेळतो तिथे प्रचंड पाठिंबा असतो आणि त्यामुळे ही स्पर्धा नक्कीच रोमांचक ठरणार आहे. अजून वर्ल्डकपला वेळ आहे, आणि त्याआधी दोन महत्त्वाच्या मालिका बाकी आहेत. त्यात संघाला अनेक गोष्टी तपासून पाहायच्या आहेत. पण एक गोष्ट नक्की येणारा वर्ल्डकप अत्यंत रोमांचक असणार आहे.”
