Suryakumar Yadav Statement on India T20 World Cup Win: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली भारताने न्यूझीलंड संघाचा ९६ धावांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाने या विश्वचषक विजेतेपदासह मोठे विक्रम केले आहेत. टीम इंडिया सलग दोन विश्वविजेतेपद पटकावणारा पहिला संघ ठरला आहे. संपूर्ण स्पर्धेत भारताच्या प्रत्येक खेळाडूने पुढे येत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. भारताच्या या ऐतिहासिक विश्वचषक विजयानंतर कर्णधार काय म्हणाला, जाणून घेऊया.

भारताने प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसन, अभिषेक शर्मा व इशान किशन या खेळाडूंच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर २५५ धावांचा डोंगर उभारला आणि टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला आणि गोलंदाजांनी हा विजय संघासाठी सोपा केला. जसप्रीत बुमराह अक्षर पटेल यांनी मिळून एकूण ७ विकेट्स मिळवल्या. भारताच्या गोलंदाजीपुढे न्यूझीलंड संघ १९ षटकांत १५९ धावा करू शकला.

कर्णधार सूर्यकुमार यादव भारताच्या विजयानंतर काय म्हणाला?

भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर कसं वाटतंय याचं उत्तर देताा कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, “आज जे घडलंय ते पूर्णपणे समजून घ्यायला थोडा वेळ लागेल, पण आजच्या यशामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. हा खूप मोठा आणि लांब प्रवास होता. २०२४ च्या विश्वचषकानंतर हा प्रवास सुरू झाला. त्या वेळी जय शाह सर तेव्हा बीसीसीआयचे सचिव, तसेच रोहित शर्मा आणि इतर सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि या कमाल संघाचं नेतृत्व करण्याची संधी दिली. त्यानंतरचा हा दीर्घ प्रवास करत नरेंद्र मोदी स्टेडियम येथे येऊन विश्वविजेते होणं ही खूप खास भावना आहे.”

“गेल्या दोन वर्षांत आम्ही सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत होतो आणि संघाची लयही उत्तम होती. २०२४ च्या टी-२० विश्वचषकात ज्या चांगल्या सवयी आणि पद्धती आम्ही अंगीकारल्या होत्या, त्याच पुढेही कायम ठेवायच्या होत्या. मी मुलांना नेहमी सांगत होतो की विश्वचषक जिंकण्याची भावना काय असते, द्विपक्षीय मालिकांमध्ये कसं खेळायचं आणि तीच जिंकण्याची भूक पुढेही कायम ठेवायची. संघाने ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे स्वीकारली,” असं कर्णधार पुढे म्हणाला.

“संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि वरूण चक्रवर्ती काय करू शकतात हे समजून घेणं खूप महत्त्वाचं होतं. मला माहिती होतं की त्यांच्यात सामना जिंकण्याची क्षमता आहे. योग्य वेळी संजूला संधी मिळाली. वरुण चक्रवर्ती आणि अभिषेक शर्मा हे जगातील अव्वल दर्जाचे खेळाडू आहेत. आम्हाला नेहमीच माहिती होतं की त्यांच्यात काहीतरी खास आहे. अंतिम सामन्यासारख्या मोठ्या मंचावर ते सिद्ध करण्याची ही सर्वोत्तम संधी होती,” असं सूर्या त्या दोघांच्या फॉर्मबद्दल म्हणाला.

“तसंच जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल हे खेळाडू खूप काळापासून संघाचा भाग आहेत आणि त्यांनी सपोर्ट स्टाफसोबत एकमेकांची उत्तम साथ दिली आहे. त्यामुळे हा विजय आणखी खास ठरतो.”

जसप्रीत बुमराह – नॅशनल ट्रेजर

“मी आधीही सांगितलं होतं, जसं मागील सामन्यानंतर संजूने त्याचा ‘सामनावीर’ पुरस्कार बुमराहला द्यायची इच्छा व्यक्त केली होती. बुमराह हा पिढीतून एकदाच जन्माला येणारा गोलंदाज आहे. सध्या त्याला आपण ‘नॅशनल ट्रेजर’ म्हणू शकतो. त्याला काय करायचं आणि कसं करायचं हे चांगलं माहिती आहे. तो आपल्या क्षेत्रातील सर्वोत्तम आहे आणि आशा आहे की तो पुढेही अशीच कामगिरी करत राहील,” असं कर्णधार सूर्यकुमार यादव भारताच्या विजयानंतर म्हणाला.