Suryakumar Yadav on India win: भारतीय संघाने न्यूझीलंडविरूद्ध पहिल्या टी-२० सामन्यात ४८ धावांची दणदणीत विजय मिळवला. नागपूरमध्ये खेळवल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारताने अभिषेक शर्माच्या ८३ धावांच्या खेळीच्या बळावर २३८ धावांचा मोठा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ १९० धावा करूच शकला. भारताच्या गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी करत न्यूझीलंडला धावा करू दिल्या नाहीत. भारताच्या या शानदार विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव काय म्हणाला, जाणून घेऊया.

भारताच्या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, “माझ्या मते धावफलकावर धावा असणं नेहमीच चांगलं असतं आणि जर थोडीफार दवांची मदत मिळत असेल, तर ती संघासाठी मोठी सकारात्मक गोष्ट ठरली. संघाची फलंदाजी पाहिली तर पॉवरप्लेमध्ये आम्ही दबावात होतो, २५ धावांत दोन विकेट्स पडल्या होत्या, त्यानंतरही आम्ही १५व्या षटकापर्यंत सामना खेचून नेला. त्यानंतर सगळ्या फलंदाजांनी सातत्य राखत खेळ सुरू ठेवला.”

भारतीय संघ पुढील सामन्यांमध्येही आठ फलंदाज व ३ स्ट्राईक गोलंदाजांसह खेळणार का, यावर विचारल्यानंतर सूर्या म्हणाला, “मला वाटतं हे कॉम्बिनेशन चांगलं दिसतंय. संघ म्हणून आमच्यासाठी हे कॉम्बिनेशन परिणामकारक ठरतेय. जर चांगलं चालत असेल तर त्यात बदल करण्याची गरज नसते, म्हणून आम्ही हेच पुढे सुरू ठेवायला हरकत नाही.”

सूर्यकुमार यादव त्याच्या फॉर्मबद्दल नेमकं काय म्हणाला?

फॉर्मशी झगडत असलेल्या सूर्याला पहिल्या टी-२० सामन्यात सूर गवसला होता. सूर्याने या सामन्यात २२ चेंडूत ४ चौकार व एका षटकारासह ३२ धावांची खेळी केली. इतकंच नव्हे तर त्याने अभिषेकसह ९९ धावांची भागीदारी रचली होती. ज्यामुळे त्याच्या फॉर्मच्य चर्चेला थोडा पूर्णविराम मिळाला. त्याच्या फलंदाजीबाबत बोलताना सूर्या म्हणाला, “मी जेव्हा फलंदाजीला उतरलो, ती वेळ माझ्यासाठी अगदी योग्य होती. दबावाची परिस्थिती होती आणि अशा परिस्थितीत मी याआधीही फलंदाजी केली आहे. आधी सांगितल्याप्रमाणे, नेट्समध्ये माझी तयारी खूप चांगली झाली होती. काही चेंडू खेळल्यानंतर माझी नैसर्गिक शैली समोर येते आणि ती कधीच बदलत नाही.”

“मी जे शॉट्स खेळलो, त्यांचा सराव मी गेल्या २–३ आठवड्यांपासून सातत्याने करत होतो. नेट्समध्ये आणि सराव सामन्यांतही. त्यामुळे आत्मविश्वास होता आणि मैदानावर ते सगळं अगदी सहजपणे घडलं,” असं सूर्याने पुढे सांगितलं.

टी-२० सामन्यांमध्ये भारताची फिल्डिंग थोडा चिंतेचा विषय आहे. संघाने अनेक कॅच सोडले आहेत. या सामन्यातही संघाने २ कॅच ड्रॉप केले. यामुळे भारताच्या फिल्डिंगबाबत बोलताना सूर्या म्हणाला, ‘हाहाहा हसत सूर्याने हे उत्तर द्यायला सुरूवात केली.’ “हो, थोड्या जास्त दवामुळे काही ठिकाणी थोडीफार अडचण येतेच. अशा वेळी मी फक्त माझ्या फिल्डर्सना साथ देण्याचा प्रयत्न करतो. पण एक संघ म्हणून आम्ही क्षेत्ररक्षण विभागात सातत्याने सुधारणा करण्यावर भर देतोय. प्रत्येक सामन्यात मैदानात उतरताना आम्ही अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मुलांनी दाखवलेल्या मेहनतीवर मी खूप समाधानी आहे.”

अभिषेक शर्माच्या खेळीबाबत कर्णधार म्हणाला, “त्याची तयारी पाहिली की लक्षात येतं, हे फक्त तो सामन्यात कसा फलंदाजी करतो यापुरतंच मर्यादित नाही. तो स्वतःला कसं तयार करतो, हॉटेलमध्ये, टीम बसमध्ये कसं वागतो, या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी मैदानावर उमटतात आणि आज तो त्या मेहनतीचं फळ अनुभवतोय.”