Suryakumar Yadav on India win: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. भारताने इंग्लंडला सेमीफायनलमध्ये ७ धावांनी थरारक विजय मिळवला आहे. भारताच्या फलंदाजांनंतर टीम इंडियाचे गोलंदाज भारताच्या विजयाचे हिरो ठरले. टीम इंडियाने प्रथम २५३ धावांचा डोंगर उभारला आणि ७ धावांनी विजय मिळवला. भारताची सांघिक कामगिरी या सामन्यातील हायलाईट गोष्ट आहे. या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव काय म्हणाला, जाणून घेऊया.
भारताकडून संजू सॅमसनने आपला वादळी फॉर्म कायम राखत ८९ धावांची उत्कृष्ट खेळी केली. यानंतर भारताच्या सर्वच फलंदाजांनी धावांचं योगदान दिलं. भारताकडून गोलंदाजीत सर्वात वाखणण्याजोगी गोलंदाजी जसप्रीत बुमराहने केली. बुमराहच्या गोलंदाजीने इंग्लंडच्या धावांना ब्रेक लावला. याशिवाय अक्षर पटेलने कमालीचे ३ झेल टिपले. त्यातील त्याचा आणि शिवम दुबेचा रिले कॅच सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला.
सूर्यकुमार यादव भारताच्या विजयानंतर नेमकं काय म्हणाला?
अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर कर्णधार सूर्या म्हणाला, “भारतामध्ये खेळताना आणि इतक्या उत्कृष्ट संघाचं नेतृत्व करताना हा अनुभव अविश्वसनीय आहे. त्यात विश्वचषकही भारतात होत आहे आणि आता अंतिम सामना खेळण्यासाठी अहमदाबादला जाणार आहोत, ही आमच्यासाठी खूप खास भावना आहे. संघातील सर्व खेळाडूंना याचा प्रचंड आनंद आहे.”
संजू सॅमसनबद्दल बोलताना कॅप्टन म्हणाला, “फलंदाजीला गेल्यापासून त्याला काय करायचं आहे हे स्पष्ट होतं. एखादी विकेट पडली तरी त्याला माहित होतं की खेळपट्टी चांगली आहे, त्यामुळे त्याने आक्रमकता कायम ठेवली. त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ती अगदी संघाला आवश्यक होती. गेल्या वर्षभरात त्याने केलेल्या मेहनतीचं हे फळ होतं. आजची त्याची खेळी खरोखरच विशेष होती.”
इंग्लंडच्या रनचेसबद्दल सूर्या म्हणाला, “इंग्लंडच्या धावांचा पाठलाग पाहिल्यानंतर मी तर हॅरी ब्रूकला मजेत विचारलं, “तुमच्याविरुद्ध आम्हाला अजून किती धावा कराव्या लागतील?” खरं सांगायचं तर खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती. इंग्लंडनेही उत्तम फलंदाजी केली आणि ते शेवटपर्यंत सामन्यात होते. पण जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि इतर गोलंदाजांनी ज्या पद्धतीने सामना परत आपल्या बाजूला खेचला, ते खरंच अविश्वसनीय होतं.”
बुमराहबद्दल बोलताना सूर्या म्हणाला, “बुमराह काय करू शकतो आणि भारतासाठी त्याने गेल्या अनेक वर्षांत काय केलं आहे, हे आपण सगळेच जाणतो. आजही त्याने तेच करून दाखवलं. त्याने पुढाकार घेत आपला आत्मविश्वास दाखवला आणि इंग्लंडपासून सामना दूर नेला. गोलंदाजीतील ती खरंच विशेष कामगिरी होती.”
“या संघात तिसऱ्या क्रमांकापर्यंत सर्व काही ठरलेलं आहे, त्यामुळे आम्हाला फार बदल करायचा नव्हता. पण एका टोकावर राशिद गोलंदाजी करत असल्याचं पाहिल्यावर शिवम दुबे हा योग्य ‘मॅच-अप’ ठरला. मागील सामन्यात मी ५० किंवा १०० धावा केल्या असत्या तरीही, आज संघासाठी तो बदल आवश्यक होता, त्यामुळे तो योग्य निर्णय होता,” असं सूर्या म्हणाला.
