Suryakumar Yadav Statement On India Win vs ZIM: भारताचा झिम्बाब्वेविरूद्धचा सामना स्पर्धेतील करो या मरो सामना होता. पण या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी वादळी फटकेबाजी करत धावांचा डोंगर उभारला. दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा पराभव टीम इंडियासाठी सेमीफायनलची शर्यत अटीतटीची झाली होती. पण झिम्बाब्वेविरूद्धच्या विजयाने भारताला दिलासा मिळाला आहे. भारताने झिम्बाब्वेचा ७१ धावांनी पराभव केला. या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव काय म्हणाला?
झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आणि टीम इंडियाच्या फलंदाजांनी तर कहर केला. भारताने २५६ धावा करत यंदाच्या विश्वचषकातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली. संजू सॅमसनने २४ धावा व अभिषेक शर्माने ५५ धावांची खेळी केली. याशिवाय इशान किशनने ३८ धावा, सूर्यकुमारने १३ चेंडूत ३३ धावांचं योगदान दिलं. यानंतर हार्दिक पंड्या व तिलक वर्माने ८४ धावांची भागीदारी रचली. हार्दिक पंड्याने अर्धशतक केलं तर तिलकने १६ चेंडूत ४४ धावा कुटल्या.
प्रत्युत्तरात झिम्बाब्वेच्या संघानेही चांगली फटकेबाजी केली. सलामीवीर ब्रायन बेनेटने नाबाद ९७ धावांची खेळी केली. तर कर्णधार सिकंदर रझाने ३१ धावा केल्या. भारताला दुसऱ्या डावात झटपट विकेट्स घेता आल्या नाहीत आणि गोलंदाजांनी बऱ्याच धावा दिल्या. दुबेच्या एका षटकात त्याने २६ धावा दिल्या, तर २ षटकांत ४६ धावा कुटल्या. तर अक्षर पटेल व वरूण चक्रवर्ती यांनी १-१ विकेट्स घेतल्या असल्या तरी त्यांनी ४ षटकांत प्रत्येकी ३५-३५ धावा दिल्या.
कर्णधार सूर्यकुमार यादव भारताच्या विजयानंतर नेमकं काय म्हणाला?
भारताच्या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, “आम्हाला जे घडलं ते मागे टाकून पुढे जायचं होतं. लीग फेरीत किंवा अहमदाबादमधील मागील सामन्यात काय झालं, याचा आम्ही जास्त विचार केला नाही. आमच्या व्हिडिओ विश्लेषकाने फलंदाज आणि गोलंदाजांसाठी एक व्हीडिओ तयार केला होता, ज्यात गेल्या वर्षभरात आम्ही काय चांगलं केलं आहे, हे दाखवलं होतं. ते पाहून आम्हाला खूप सकारात्मक एनर्जी मिळाली आणि स्पष्ट मनोवृत्तीने आम्ही या सामन्यात उतरलो.”
भारताच्या सामन्यातील कामगिरीबद्दल म्हणाला, “पहिल्या क्रमांकापासून ते सातव्या क्रमांकापर्यंत सर्व फलंदाजांनी योगदान दिलं. त्यामुळे आमच्या कामगिरीत फारशी उणीव वाटली नाही. प्रामाणिकपणे सांगायचं तर गोलंदाजीत थोडं अधिक अचूक आणि काटेकोर राहता आलं असतं. पण शेवटी विजय म्हणजे विजयच असतो. वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना आम्ही नक्कीच काही बाबतीत अधिक सुधारणा करू.”
सूर्याने झिम्बाब्वेच्या फलंदाजीचं कौतुक करत गोलंदाजीत कमी पडल्याचं सांगताना म्हणाला, “झिम्बाब्वेच्या फलंदाजांचंही कौतुक करावं लागेल. त्यांनी अतिशय सुंदर फलंदाजी केली. हो, खेळपट्टी चांगली होती; पण पॉवरप्लेमध्ये संयम दाखवत आणि नंतर योग्य वेळी गती वाढवत त्यांनी डाव उभारला, ते प्रभावी होतं. त्यांनाही श्रेय द्यायलाच हवं. मात्र गोलंदाजीच्या दृष्टीने काही निर्णायक क्षणी आम्ही पर्याय अधिक शहाणपणाने वापरायला हवे होते.”
वेस्ट इंडिजविरूद्ध व्हर्च्युअल क्वार्टर फायनल सामन्याविषयी बोलताना सूर्या म्हणाला, “अशा परिस्थितीत निर्णय घेताना धाडस दाखवणं गरजेचं असतं. सकारात्मक मार्ग स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. आम्ही कोलकात्याला पोहोचल्यानंतर त्या सामन्यासाठी नीट बसून सविस्तर नियोजन करू. सध्या मात्र एक दिवस विश्रांती घेणं, प्रवास करणं आणि थोडं रिलॅक्स होणं महत्त्वाचं आहे.”
