Suryakumar Yadav Statement on Indian Win: भारतीय संघाने ईशान किशन व सूर्यकुमार यादवच्या वादळी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडवर दुसऱ्या टी-२० सामन्यातही दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने मालिकेतील सलग दोन सामने जिंकत २-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात, भारतीय संघाने २०९ धावांचं मोठं लक्ष्य अवघ्या १५.२ षटकांत सहज गाठलं आणि ऐतिहासिक विजय नोंदवला. पण सूर्यकुमार यादव सामन्यादरम्यान ईशान किशनवर रागावला होता, याचा खुलासा त्याने सामन्यानंतर केला आहे.

रायपूरमधील दुसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाला २०९ धावांचे लक्ष्य मिळाले होते आणि त्यांनी ते फक्त १५.२ षटकांत तीन विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. या सामन्यात टीम इंडियाने त्यांचे दोन्ही सलामीचे फलंदाज फक्त ६ धावांत गमावले. यानंतर ईशान किशन व सूर्यकुमार यादव यांनी संघाचा डाव सावरला आणि संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं.

सूर्यकुमार यादवने या सामन्यात ३७ चेंडूत ९ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ८० धावांची खेळी केली. तर ईशान किशनने या सामन्यात ३२ चेंडूत ११ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ७६ धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला. यासह या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ४८ चेंडूत १२२ धावांची भागीदारी साकारली.

सूर्यकुमार यादव भारताच्या विजयानंतर काय म्हणाला?

सामन्यानंतर बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला, “दुपारी ईशानने जेवणात काय खाल्लं होतं किंवा सामन्यापूर्वी कोणतं प्री-वर्कआउट केलं होतं, हे मला माहित नाही. पण ६ धावांत २ विकेट पडलेल्या असतानाही एखादा फलंदाज अशा पद्धतीने फलंदाजी करतो आणि पॉवरप्लेअखेर संघाचा स्कोअर ६७-७०पर्यंत नेतो, असं मी याआधी कधी पाहिलं नव्हतं. २००-२१० धावांचा पाठलाग करताना आम्हाला फलंदाजांकडून हेच अपेक्षित असतं. मैदानात जाऊन स्वतःला मोकळेपणाने व्यक्त करावं, आनंदात खेळावं, आज ईशानने नेमकं तेच केलं.”

सूर्यकुमार पुढे म्हणाला, “पॉवरप्लेमध्ये त्याने (इशानने) मला स्ट्राइक दिली नाही, याचं थोडा राग आला होता, पण ठीक आहे. मला वेळ मिळाला, आठ-दहा चेंडू खेळलो आणि नंतर संधी मिळाल्यावर ते भरून काढता येईल, याची खात्री होती.”

सूर्या त्याच्या फॉर्मबद्दल व खेळीबद्दल बोलताना म्हणाला, “मी आधीही सांगितलं, नेट्समध्ये माझी फलंदाजी खूप चांगली होत होती. मागील दोन-तीन आठवड्यांत घरी जे काही केलं, सराव, तयारी त्याचा मोठा फायदा झाला. कुटुंबीय आणि मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी चांगला ब्रेक मिळाला, दर्जेदार सराव सत्रं झाली आणि सध्या जे घडतंय त्याचा मी मनापासून आनंद घेतोय.”

दव असतानाही न्यूझीलंडला २०८ धावांवर रोखलं, याबद्दल कॅप्टन म्हणाला, “हो, हा अप्रतिम प्रयत्न होता. तेव्हा ते १००-११० धावांत २ विकेट्सवर होते, त्यामुळे नागपूरसारखा २२५-२३० चा स्कोअर होईल असं वाटत होतं. पण कुलदीप, वरुण आणि दुबेने टाकलेला ती षटकं या सगळ्यांनी कठीण परिस्थितीत जबाबदारी घेतली. सर्व गोलंदाजांनी योगदान दिलं आणि त्यांना २०८वर रोखणं ही गोलंदाजी युनिटची मोठी कामगिरी आहे.”

प्रतिस्पर्धी संघांवर या कामगिरीमुळे संघाची दहशत निर्माण होतेय का, यावर कर्णधार म्हणाला, “सध्या जे घडतंय त्याचा मी खूप आनंद घेतोय. कॅम्पमधला माहोल आनंदी आहे आणि तो तसाच ठेवायचा आहे. परिस्थिती काहीही असो, आम्हाला याच पद्धतीचा ब्रँड ऑफ क्रिकेट खेळत राहायचा आहे आणि कुठलीही कसर सोडायची नाही.”