Suryakumar Yadav Reaction on Mitchell Santner Remark: भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. भारतात होणाऱ्या या अंतिम सामन्यावर सध्या सर्वांच्या नजरा खिळून आहेत. हा अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाईल. या फायनलच्या पूर्वसंध्येला दोन्ही संघांच्या कर्णधारांची पत्रकार परिषद पार पडली. यादरम्यान सूर्याने मिचेल सँटरनच्या मोठ्या गर्दीला शांत करण्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने सँटनरच्या विधानाला फारसं महत्त्व दिलं नाही. टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय प्रेक्षकांना शांत करण्याबाबत सँटनरने केलेल्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना सूर्यकुमार म्हणाला की, मोठ्या सामन्यांपूर्वी अशा प्रकारची विधानं आता नेहमीचीच झाली आहेत.
भारतीय संघ वनडे विश्वचषक २०२३ मधील अंतिम सामन्यानंतर पुन्हा एकदा टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना याच मैदानावर खेळणार आहे. भारताला २०२३ मध्ये हृदयद्रावक पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. मिचेल सँटनरने मोठ्या गर्दीला शांत करण्याचं हे विधान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सप्रमाणेच आहे. जे त्याने २०२३ च्या वनडे विश्वचषक फायनलपूर्वी केलं होतं.
“मोठ्या गर्दीला शांत करणं हेच आमचं लक्ष्य आहे. टी-२० क्रिकेटमध्ये अनेक गोष्टी अनिश्चित असतात आणि कधीही सामना पलटू शकतो. आम्ही आमचा खेळ त्याच पद्धतीने खेळलो तर आणखी एका मोठ्या संघाला धक्का देऊ शकतो. घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकण्याचा भारतावर मोठा दबाव असणार, हे स्पष्ट आहे,” असं सँटनर पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाला.
सँटनरच्या वक्तव्यावर सूर्याने दिलेल्या उत्तराने वेधलं सर्वांचं लक्ष
सँटनरच्या या वक्तव्याबाबत विचारलं असता भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने मिश्किल प्रतिक्रिया दिली. “सगळे काय तेच वाक्य बोलत आहेत. त्यांनी काहीतरी नवीन प्रयत्न करायला हवा,” असं सूर्यकुमार यादवने पत्रकारांशी बोलताना म्हटलं. तसंच, घरच्या मैदानावर विश्वचषकाचा अंतिम सामना खेळण्याची संधी भारतीय संघ आनंदाने अनुभवत असल्याचंही त्याने सांगितलं. ड्रेसिंग रूममधील वातावरण सध्या खूप सकारात्मक असल्याचंही सूर्यकुमारने नमूद केलं.
फायनलसाठी संघातील वातावरणाबद्दल सांगताना म्हणाला, “ही खूप खास भावना आहे. सगळेच खूप उत्साहित आहेत. आमच्या गटात खूप चांगलं वातावरण आहे आणि आम्ही या मोठ्या अंतिम सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहोत.”
न्यूझीलंड संघाने उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा ९ विकेट्सने एकतर्फी पराभव केला आणि अंतिम फेरी गाठली. न्यूझीलंड संघाने आजपर्यंत टी-२० विश्वचषक जिंकलेला नाही.
