Suryakumar Yadav Statement on MI Defeat: दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा ६ विकेट्सने पराभव करत गुणतालिकेत पहिलं स्थान गाठलं आहे. दिल्लीच्या मैदानावर मुंबई इंडियन्सचा संघ मोठ्या मेहनतीने १६२ धावा करू शकला. तर प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्स संघाने समीर रिझवीच्या ९० धावांच्या खेळीच्या बळावर १८.१ षटकांत सहज विजय मिळवला. हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्त्व सूर्यकुमार यादवने केलं. मुंबईच्या पराभवानंतर कर्णधार सूर्या काय म्हणाला, जाणून घेऊया.

दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात मुंबईच्या संघाला धावा काढण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागले. दिल्लीची खेळपट्टी संथ होती आणि त्यात दिल्लीच्या सर्वच गोलंदाजांनी केलेल्या अचूक व भेदक गोलंदाजीमुळे मुंबईचे सर्वच फलंदाज अपयशी ठरले. रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांनी संघाचा डाव सावरला. रोहित शर्मा ३५ धावा तर सूर्याने अर्धशतकी खेळी केली. तर नमन धीर २८ धावांवर बाद झाला.

सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्सच्या पराभवासाठी कोणाला धरलं जबाबदार?

सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, “मला वाटतं खेळपट्टी ठीकठाक होती. खेळपट्टी थोडी संथ असेल अशी अपेक्षा होती, पण फलंदाजीच्या दृष्टीने आम्ही सुमारे १५-२० धावा कमी पडलो. तरीही मी गोलंदाजांचं श्रेय कमी करणार नाही आणि त्यांच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात खूप चांगली फलंदाजी केली.”

समीर रिझवीबद्दल सूर्या म्हणाला, ठ७ धावांवर २ विकेट्स गेल्यानंतर ज्या पद्धतीने त्याने मैदानावर येऊन फलंदाजी केली, त्याचं खूप कौतुक आहे. त्याने आम्हाला सामन्यात परत येऊ दिलं नाही. आम्ही गोलंदाजीत आमच्या रणनिती राबवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण आम्हाला पुनरागमन करता आलं नाही.”

“मला वाटतं खेळपट्टी जवळजवळ तशीच राहिली, फारसा बदल झाला नाही. पण त्यांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ती खूपच उत्कृष्ट होती. त्यांनी परिस्थिती ओळखत जुळवून घेत दुसऱ्या डावात सुंदर फलंदाजी केली. हे मान्य करावं लागेल की, जो स्कोअर चांगला वाटत होता तोही अपुरा ठरला. पहिल्यांदा फलंदाजी करताना स्कोअरचा फार विचार करत नाही, फक्त खेळत राहायचं असतं आणि परिस्थिती समजून घ्यायची असते. आम्हाला वाटलं १८०-१८५ हा चांगला स्कोअर असेल, पण आम्ही १५-२० धावा कमी पडलो,” असं सूर्या पुढे म्हणाला.

मी आणि नमन दोघेही चुकीच्या वेळी बाद झालो, नाहीतर आम्ही नक्कीच जास्त धावा केल्या असत्या. असे दिवस येतात, जेव्हा प्रयत्न करूनही यश मिळत नाही. पण आम्ही पुन्हा तयारीला लागू, मेहनत करू आणि पुढच्या सामन्यात जोरदार पुनरागमन करू,” असं अखेरीस सूर्यकुमार यादव म्हणाला. मुंबई इंडियन्सचा पुढील सामना आता मंगळवारी ८ एप्रिलला राजस्थान रॉयल्सविरूद्ध खेळणार आहे.