Suryakumar Yadav Statement on POTS Award: भारतीय संघाची टी-२० विश्वचषक २०२६ साठी जोरदार तयारी झालेली भारत आणि न्यूझीलंड टी-२० मालिकेतून दिसून आली. टीम इंडियाने अखेरच्या टी-२० सामन्यात ४६ धावांनी मोठा विजय नोंदवला. टीम इंडियासाठी या मालिकेनंतर अजून एक दिलासादायक गोष्ट म्हणजे संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव फॉर्मात परतला आहे. गेल्या वर्षभरात सूर्यादादाच्या बॅटमधून फारशा धावा येत नव्हत्या. पण न्यूझीलंडविरूद्धच्या टी-२० मालिकेचा सूर्या प्लेअऱ ऑफ द सिरीजचा अवॉर्ड मिळाला आहे. यानंतर सूर्या त्याच्या फॉर्मबद्दल आणि संघाच्या कामगिरीबद्दल काय म्हणाला, जाणून घेऊया.

भारताने प्रथम फलंदाजी करताना २७१ धावांचा डोंगर उभारला. टीम इंडियाकडून इशान किशनने शतक झळकावलं. तर कर्णधार सूर्यकुमार यादवने ३० चेंडूत ६३ धावांची खेळी केली. यासह न्यूझीलंडचा संघ २७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फिन एलनने ८० धावांची खेळी करत टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरला. पण अक्षर पटेलने संघासाठी गेमचेंजर ठरला. त्याने सुरूवातीच्या षटकांमध्ये महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. तर अर्शदीप सिंगने ५ विकेट्स घेतल्या.

सूर्यकुमार यादव प्लेअर ऑफ द सिरीज जिंकल्यानंतर त्याच्या फॉर्मबद्दल म्हणाला, “हे सगळं खूपच छान वाटतंय. गेलं वर्ष फॉर्मच्या दृष्टीने ज्यापद्धतीचं होतं ते पाहता या क्षणांची वाट पाहत होती. गेल्या मालिकेत जेव्हा अहमदाबादमध्ये आपली भेट झाली होती, तेव्हा तुम्ही (मुरली कार्तिक) म्हटलं होतं, when SKY is there, don’t fear. गेल्या वर्षभरात मी जे करत होतो तेच करत राहिलो, माझ्या रुटीनला चिकटून राहिलो. मला माहित होतं की मी फॉर्मबाहेर नाही, फक्त धावा येत नव्हत्या. ही मालिका माझ्यासाठी खूपच चांगली ठरली आणि असा आत्मविश्वास घेऊन विश्वचषकात जाणं खूप खास आहे.”

धावा येत नव्हत्या तेव्हा मनात काय सुरू होतं? याबद्दल बोलताना सूर्या म्हणाला, “हेच आयुष्य आहे. हा प्रवासाचाच एक भाग आहे. मी ते शांतपणे स्वीकारलं, पुन्हा बेसिक गोष्टींकडे परत गेलो आणि काय चुकतंय ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. मागील मालिकेनंतर मला दोन-तीन आठवडे मिळाले, तेव्हा मी जवळच्या मित्रांसोबत वेळ घालवला. त्यांनी मला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या, कुठे काय बदलता येईल हे सांगितलं. खेळाडूचं आयुष्य असंच असतं. क्रिकेटच नव्हे तर इतर खेळांतही अनेक कारकिर्दी मी पाहिल्या आहेत, जिथे असे टप्पे येतात. मला खात्री होती की छोट्या गोष्टी योग्य पद्धतीने करत राहिलो, तर माझी वेळ नक्की येईल. सध्या सगळं जसं घडतंय त्याबद्दल मी खूप आनंदी आहे.”

सूर्यकुमार भारताच्या विजयानंतर नेमकं काय म्हणाला?

संघाच्या कामगिरीबाबत समाधानी आहे का, याबद्दल बोलताना सूर्या म्हणाला, “नक्कीच. जिंकलो किंवा हरलो, तरी प्रत्येक सामन्यातून काही ना काही शिकायला मिळतंच. मुंबईला परतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या सराव सामन्याआधी आम्ही बसून शेवटचे पाच सामने आणि संपूर्ण वर्षाचं विश्लेषण करू, काय चांगलं केलं आणि कुठे सुधारणा करता येईल, हे पाहू. त्यानंतर आमची मोहीम सुरू होईल.”

“हा फॉरमॅट गोलंदाजांसाठी खूप कठीण आहे, हे मला माहित आहे आणि मी समजतोही. तुम्ही मोठ्या धावा करता, तेव्हा प्रतिस्पर्धी संघ आक्रमक होणारच. कर्णधार म्हणून आणि गोलंदाजी युनिट म्हणून नेहमीच दबाव असतो. योग्य रणनिती असणं हे महत्त्वाचं आहे. हा सगळा शिकण्याचाच भाग आहे. आम्ही बसून चर्चा करू, त्यातून शिकू आणि पुढे वाटचाल करू,” असं सूर्या अखेरीस म्हणाला.