Suryakumar Yadav Reveals Gautam Gambhir Message: एकटा सूर्यकुमार यादव अमेरिकेच्या संघावर भारी पडला. सूर्यकुमार यादवने अमेरिकेविरूद्ध सामन्यात नाबाद ८६ धावांची खेळी करत टीम इंडियाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. एका टोकाकडून झटपट विकेट्स पडत असताना सूर्या दुसऱ्या टोकाला पाय घट्ट रोवून उभा होता. सूर्यकुमार यादव फलंदाजी करत असताना गौतम गंभीरने त्याला मैदानावर येऊन काय मेसेज दिला, याचा खुलासा त्याने सामन्यानंतर केला आहे.

सूर्यकुमार यादवने अमेरिकेविरूद्ध सामन्यात सावध सुरूवात करत वेळप्रसंगी संधी मिळताच आक्रमक फटके खेळले. अखेरच्या षटकात त्याने चौकार-षटकारांचा पाऊस पाडत भारताला १६१ धावांचा पल्ला गाठून दिला, जिथे भारत १४० धावा करण्याची शाश्वती दिसत नव्हती. सूर्याने ४९ चेंडूत १० चौकार व ४ षटकारांसह नाबाद ८६ धावांची खेळी केली. शुभम रांजणेने त्याचा सोडलेला झेल अमेरिकेला चांगलाच महागात पडला. सूर्याला या खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

सामनावीराचा पुरस्कार जिंकल्यानंतर सूर्यादादाचं मोठं वक्तव्य

सूर्यकुमार यादव सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, “मला खात्री होती की हा क्षण (त्याची मॅचविनिंग खेळी) कधीतरी नक्की येणार आहे. गेल्या संपूर्ण वर्षभर मी संघासाठी डाव सावरून ठेवण्याच्या उद्देशाने फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते जुळून येत नव्हतं. मात्र, मागील वर्षाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेविरुद्धची शेवटची मालिका खेळल्यानंतर मी सगळं थोडं बाजूला ठेवलं. किट बॅग पॅक केली आणि दोन आठवडे कुटुंबासोबत भरपूर वेळ घालवला. त्यानंतर नव्या वर्षाची सुरुवात झाली आणि जेव्हा आम्ही नागपूरला पोहोचलो, तेव्हा सगळंच वेगळं होतं.”

संघाची अवस्था ७७/६ असताना सूर्यकुमार यादव काय विचार करत होता, याबद्दल बोलताना त्याने सांगितलं, “मला त्यावेळेला वाटत होतं की एखाद्या फलंदाजाने शेवटपर्यंत टिकून राहत खेळणं गरजेचं आहे. मला ही खेळपट्टी १८०-१९० धावांची वाटलीच नाही, तर साधारण १४० धावांचीच वाटत होती. १४ षटकांनंतरच्या ब्रेकमध्ये गौतम भाईनेही मला हेच सांगितलं. तो म्हणाला, “फक्त शेवटपर्यंत खेळत राहा, धावा कधीही भरून काढता येतील.”

मुंबईच्या मैदानावरील या खेळीविषयी बोलताना तो म्हणाला, “सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी माझं बहुतांश क्रिकेट मुंबईत खेळलो आहे. या प्रकारच्या खेळपट्ट्यांवर आणि मुंबईच्या मैदानांवर. त्यामुळे अशा विकेट्सवर कसं खेळायचं, याची मला चांगली जाण आहे.”

खेळपट्टीशी जुळवून घेण्याबाबत बोलताना सूर्याने सांगितलं, “७७ धावांवर ६ विकेट्स अशी अवस्था असताना एक फलंदाज शेवटपर्यंत खेळणं गरजेचं होतं, हे समजून घ्यावं लागतं. मी फक्त हे पाहत होतो की पुढे कोण गोलंदाजी करणार आहे, किती चेंडू शिल्लक आहेत आणि त्यानुसार माझे फटके, योग्य पद्धतीने खेळण्यावर लक्ष केंद्रित केलं.”