Suryakumar Yadav Statement on MI defeat: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रोमांचक आणि कमी धावसंख्येच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला दोन गडी राखून पराभूत केलं. गतविजेत्या बंगळुरूने शेवटच्या चेंडूवर १६७ धावांचं लक्ष्य गाठत एक थरारक विजय मिळवला. यामुळे मुंबई इंडियन्स आयपीएल २०२६ मधून बाहेर पडली आहे. या विजयामुळे बंगळुरूने सलग दोन पराभवांची मालिका खंडित करत गुणतालिकेत पुन्हा अव्वल स्थान पटकावलं आहे.

आरसीबीने नाणेफेक जिंकत मुंबईला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केलं. मुंबईने सुरूवात चांगली केली खरी, पण संघाने पॉवरप्लेमध्ये ३ विकेट्स गमावल्याचा फटका त्यांना बसला. आरसीबीने चांगली गोलंदाजी करत मुंबईला अवघ्या १६६ धावांवर रोखलं. त्यानंतर मुंबईनेही कमालीची फलंदाजी करत आरसीबीच्या धावांवर नियंत्रण ठेवलं होतं, पण अखेरीस आरसीबीने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवत सामना जिंकला.

मुंबई इंडियन्सच्या मुख्य गोलंदाजांनी डेथ ओव्हर्समधील सुरूवातीची षटक टाकल्याने अखेरचं षटक टाकण्याची जबाबदारी अष्टपैलू राज अंगद बावाला देण्यात आली. राज बावाला १५ धावांचा बचाव करायचा होता, त्याने सुरूवात चांगली केली, पण अखेरीस आरसीबीने बाजी मारली. राजने वाईड यॉर्कर्सच्या प्रयत्नात ३ वाईड टाकले आणि एक नो बॉल टाकला. त्यात त्याने शेफर्डची विकेट मिळवली. पण भुवनेश्वरने मात्र षटकार मारल्याने सामन्याचं चित्र पालटलं. याशिवाय अखेरच्या चेंडूवर २ धावांची गरज असताना रसिख सलामने सरळ दिशेत मारलेला चेंडू राजच्या हातातून सुटला आणि त्यामुळे आरसीबीने सहज धावा काढल्या आणि सामना जिंकला.

मुंबई इंडियन्स स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार सूर्या काय म्हणाला?

यानंतर अखेरच्या षटकाबद्दल बोलताना कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, “मला वाटतं त्याने (राज बावाने) डेथ ओव्हर्समधील गोलंदाजीवर खूप मेहनत घेतली होती आणि यावर्षी तो पूर्णपणे वेगळाच अष्टपैलू खेळाडू म्हणून समोर आला. त्याने जवळपास आमच्यासाठी सामना जिंकूनच दिला होता. पण माझ्या मते आम्ही १०-१५ धावा कमी पडलो. फलंदाजीदरम्यान चुकीच्या वेळी विकेट्स गमावल्या, असंही म्हणता येईल.”

फलंदाजीबद्दल म्हणाला, “नमन आणि तिलक यांनी अप्रतिम फलंदाजी करत संघासाठी लढण्याची जिद्द दाखवली. क्षेत्ररक्षणातही तुम्ही सतत अशाच गोष्टींचा सराव करत असता. तिलकने पहिल्यांदा झेल सुटल्यानंतर पुन्हा परत येऊन झेल पकडला, यातून तो काहीतरी खास करण्याच्या निर्धारात असल्याचं दिसलं. हा खेळाचाच एक भाग आहे. आपण हा खेळ खेळतो कारण आपलं खेळावर प्रेम आहे. हा पराभव स्वीकारणं खूप कठीण आहे. पण आशा आहे की पुढच्या वर्षी आम्ही अधिक दमदार पुनरागमन करू. आणि बॉशने पॉवरप्लेपासून ते प्रत्येक टप्प्यात ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, त्याचा मला खूप अभिमान आहे.”