Suryakumar Yadav On Retirement After T20 WC Win: भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने घरच्या मैदानावर टी-२० विश्वचषकाचं जेतेपद पटकावलं. भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणारा तो तिसरा कर्णधार ठरला. कर्णधार म्हणून त्याच्या पहिल्याच विश्वचषकात विश्वविजेता बनून त्याने एमएस धोनीची बरोबरी केली आणि रोहित शर्मालाही मागे टाकलं. देशभरात भारतीय संघाचं कौतुक होत केलं जात आहे. दरम्यान अंतिम सामन्यानंतर पत्रकार परिषदेत कर्णधार सूर्यकुमार यादवनेही त्याच्या निवृत्तीबद्दल उत्तर दिलं.

२०२४ च्या टी-२० विश्वचषकानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी निवृत्ती घेतली होती. तीन दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीनंतर एक नवीन संघ तयार करण्यात आला होता आणि सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. आता, सूर्याने त्याच्या निवृत्तीसंबंधित चर्चांवर पत्रकार परिषदेत स्पष्ट उत्तर दिलं आहे. त्याने त्याच्या भविष्यातील योजना देखील सांगितल्या.

सूर्यकुमार यादव टी-२० विश्वचषक विजयानंतर निवृत्ती घेणार?

कॅप्टन सूर्यकुमार यादवने निवृत्तीबद्दलच्या प्रश्नांवर हसून उत्तर दिले, “भावा, निवृत्तीचा विचार का करायचा? सगळं काही ठीक चाललंय.” त्यांनी त्यांच्या भविष्यातील योजनांबद्दल देखील यादरम्यान सांगितलं आहे. सूर्यकुमार यादवला सातत्याने केलेल्या कामगिरीच्या बळावर फार उशिरा भारतीय संघात संधी मिळाली. सूर्या सध्या ३५ वर्षांचा असला तरी त्याने सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करत संघाचं नेतृत्त्वदेखील उत्तम केलं आहे.

टी-२० विश्वचषक विजयानंतर, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषदेत हजेरी लावली. त्यांनी माध्यमांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. कर्णधाराने त्याच्या भविष्यातील योजना स्पष्ट केल्या आणि सांगितलं की तो कुठेही जाणार नाही. त्याचं लक्ष्य आता ऑलिम्पिक सुवर्णपदक आणि पुढील विश्वचषकावर आहे. दरम्यान संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, वरुण चक्रवर्ती यांच्याबद्दलही अनेक प्रश्नांची उत्तर दिली.

सूर्यकुमार यादवने भविष्यातील प्लॅन्सबद्दल बोलताना सांगितलं, “पुढचं लक्ष्य आता २०२८मध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक आणि टी-२० विश्वचषक जिंकणं हे आहे.” सूर्याने हे वक्तव्य करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्या.

सूर्यकुमार यादवने भारताने वर्ल्डकप जिंकल्यानंतर अहमदाबादच्या खेळपट्टीचे आभार मानले. सूर्याने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीवरील माती कपाळावर लावली आणि हाताला किसदेखील केलं. यापूर्वी, कर्णधार रोहित शर्माने २०२४ च्या टी-२० विश्वचषक विजयानंतर बार्बाडोसमधील खेळपट्टीची चव चाखताना दिसल होता. आता, सूर्यानेही अशीच एक कृती केली, ज्याने सर्वांचं लक्ष वेधलं होतं.