Rohit Sharma Suryakumar Yadav Viral Video: टी-२० विश्वचषक २०२६ मधील भारत आणि अमेरिका यांच्यातील सामन्यापूर्वी रोहित शर्माची झलक वानखेडेवर पाहायला मिळाली. रोहित शर्मा यंदाच्या टी-२० विश्वचषक २०२६ चा ब्रँड अम्बेसेडर आहे. रोहित शर्मा या दरम्यान विश्वचषकाची ट्रॉफी मैदानावर घेऊन येताना पाहिलं. यादरम्यान त्याने टीम इंडियातील खेळाडूंचीदेखील भेट घेतली. यादरम्यान सूर्याने नाणेफेकीपूर्वी रोहित शर्माला पाहताच केलेल्या कृतीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. यादरम्यान रोहित-सूर्यामध्ये काय बोलणं झालं, याचा व्हीडिओ आयसीसीने शेअर केला आहे.

भारताने टी-२० विश्वचषकात अमेरिकेचा २९ धावांनी पराभव करून पहिला विजय मिळवला. कर्णधार सूर्यकुमार यादवने भारताच्या विजयात उत्कृष्ट फलंदाजी करत ८४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याच्या या मॅचविनिंग खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. सूर्याने आपल्या खेळीने चाहत्यांची मनं जिंकली, तर दुसरीकडे कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेकीच्या वेळी असं काही केलं ज्याचं कौतुक केलं जात आहे.

सूर्यादादाने रोहितला पाहताच केलेल्या कृतीने जिंकली सर्वांची मनं

खरं तर, सूर्या नाणेफेकीसाठी उभा असताना, त्याने रोहित शर्माला भारतीय खेळाडूंशी हस्तांदोलन करताना पाहिलं. रोहितला मैदानावर पाहून सूर्याने नाणेफेक थांबवली आणि तो त्याच्या कर्णधाराला भेटण्यासाठी धावला. रोहितजवळ पोहोचून त्याने त्याला मिठी मारली.

रोहितला भेटल्यावर सूर्याने त्याला विचारलं, “लवकर सांग बॅटिंग की बॉलिंग?” रोहित म्हणाला, “वेडा आहेस का? फिल्डिंग कर…” या दोघांमधील हा संवाद आयसीसीच्या व्हीडिओमध्ये स्पष्ट ऐकून येत आहे. रोहितला पाहता सूर्याने केलेल्या या कृतीने सोशल मीडियावर चाहत्यांकडून चांगलंच कौतुक होत आहे. रोहितने सूर्याशीही बोलून त्याला सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सूर्यकुमार यादवने आपल्या ८४ धावांच्या खेळीने रोहित शर्माचा विक्रम मोडला. सूर्या आता आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये भारतीय भूमीवर सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. सूर्याने आतापर्यंत भारतात ८६ षटकार मारले आहेत, तर रोहितने ८५ षटकार मारले आहेत. भारताने अमेरिकाविरूद्ध सामन्यात २० षटकांत १६१ धावा केल्या, त्यानंतर अमेरिकेचा संघ भारताच्या गोलंदाजीसमोर २० षटकांत ८ गडी गमावून १३२ धावा करू शकला. यासह, भारताने २९ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. सिराजने भारताकडून तीन विकेट्स घेतल्या आणि आपल्या गोलंदाजीने खळबळ उडवून दिली.