Suryakumar Yadav IND vs NZ 1st T20I: भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने आपल्या कारकिर्दीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादवने हा टप्पा गाठला. पहिल्या सामन्याची नाणेफेक न्यूझीलंड संघाने जिंकत भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. सूर्यकुमार यादवने बाबर आझमला मागे टाकत नवा विक्रम आपल्या नावे केला.

भारताने प्रथम फलंदाजी करताना या सामन्यात धावांचा डोंगर उभारला. भारताने सूर्यकुमार यादव व अभिषेक शर्मा यांच्या ९९ धावांच्या भागीदारीच्या बळावर २३८ धावांचा डोंगर उभारला. भारताकडून अभिषेक शर्माने ८३ धावांची शानदार खेळी केली. तर अखेरच्या षटकांमध्ये रिंकू सिंहने ४४ धावांची खेळी करत संगाला २३८ धावांपर्यंत नेलं. यामध्ये कर्णधार सूर्यकुमार यादवने ३२ तर हार्दिकने २५ धावांचं योगदान दिलं होतं.

फॉर्मशी झगडत असलेल्या सूर्यकुमार यादवला या सामन्यात सूर गवसला होता आणि त्याच्या बॅटमधून चौकार-षटकारांची झलक पाहायला मिळाली. सूर्यकुमार यादवने न्यूझीलंडविरुद्धचा हा टी-२० सामना त्याच्या कारकिर्दीतील १०० वा टी२० सामना ठरला. यासह, तो रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पंड्यानंतर भारतासाठी १०० किंवा त्याहून अधिक टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा चौथा खेळाडू बनला.

सूर्यकुमार यादवने या कामगिरीसह पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमचा विक्रमही मोडला, ज्याने पूर्ण-सदस्यीय संघांमध्ये सर्वात जलद १०० टी-२० सामने खेळण्याचा विक्रम केला होता. सूर्यकुमार यादवने आता त्याला याबाबतीत मागे टाकलं आहे. बाबरला १०० टी-२० सामने पूर्ण करण्यासाठी २,४१० दिवस लागले होते, तर सूर्यकुमार यादवने फक्त १,७७४ दिवसांत १०० वा सामना खेळला आहे. म्हणजेच त्याने हा विक्रम ६३६ दिवसांपूर्वी आपल्या नावावर केला.

सूर्यकुमार यादवने पहिल्या टी-२० सामन्यात फॉर्मात परत आल्याचे संकेत दिले आहेत. सूर्याने या सामन्यात २२ चेंडूत ४ चौकार व एका षटकारासह ३२ धावा केल्या. यादरम्यान सूर्याने अभिषेक शर्मासह ४७ चेंडूत ९९ धावांची भागीदारी रचली. टी-२० विश्वचषकापूर्वी भारताची ही अखेरची टी-२० मालिका आहे. या मालिकेत टीम इंडिया वर्ल्डकपसाठीचा आपला सराव पूर्ण करणार आहे.

टी२० विश्वचषक २०२६ येत्या ७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे, ज्यामध्ये टीम इंडियाला जेतेपद राखण्यासाठी उतरणार आहे. यावेळी, संघाचे वरिष्ठ खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा संघात नसतील, कारण २०२४ चा टी-२० विश्वचषक पटकावल्यानंतर दोघांनीही टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे, सूर्यावर संघाला विजयाकडे नेण्याची जबाबदारी असेल.