Captain Suryakumar Yadav Surpasses MS Dhoni: टी-२० विश्वचषक २०२४ जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी-२० मधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर सूर्यकुमार यादवची पुढील कर्णधार म्हणून घोषणा करण्यात आली. सूर्याच्या नेतृत्त्वाखाली भारताच्या टी-२० संघाने भारतात आणि परदेशातही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारताच्या टी-२० संघाचे कर्णधारपद स्वीकारल्यापासून टीम इंडियाने एकही टी-२० मालिका गमावलेली नाही. आगामी टी२० विश्वचषकापूर्वी, भारतीय संघाने न्यूझीलंडचा मालिकेत पराभव केला. या मालिकेनंतर सूर्याने कर्णधार म्हणून धोनीला मागे टाकत नवा विक्रम आपल्या नावे केला आहे.
भारताने घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळली, जी त्यांनी ४-१ ने जिंकली. अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा ४६ धावांनी मोठा पराभव केला. भारताने न्यूझीलंडला विजयासाठी २७२ धावांचं लक्ष्य दिलं होतं, पण न्यूझीलंडचा संघ धावांचा पाठलाग करताना २२५ धावांवर सर्वबाद झाला. या विजयासह सूर्याने एका खास यादीत टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीला मागे टाकलं.
आजकाल टी-२० स्वरूपात धावसंख्येचा बचाव करणं कोणत्याही संघासाठी सोपं काम नाही, त्यामुळे गोलंदाजांवरही प्रचंड दबाव असतो. लक्ष्याचा पाठलाग करण्याच्या बाबतीत नेहमीच उत्कृष्ट मानला जाणारा भारतीय संघ आतापर्यंत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण २७ पैकी २१ सामन्यांमध्ये धावसंख्येचा बचाव करण्यात यशस्वी झाला आहे.
सूर्यकुमार यादवने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक सामन्यांमध्ये धावसंख्येचा बचाव करण्याच्या बाबतीत एमएस धोनीला मागे टाकलं आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली, भारतीय संघाने धावसंख्येचा बचाव करत २० वेळा विजय मिळवला आहे. रोहित शर्मा या यादीत अव्वल स्थानावर आहे, त्याच्या नेतृत्वाखाली संघाने २७ विजय मिळवले आहेत.
आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये धावसंख्येचा बचाव करताना सर्वाधिक विजय मिळवणारे कर्णधार
रोहित शर्मा – २७ विजय
केन विल्यमसन – २७ विजय
असगर अफगाण – २५ विजय
सूर्यकुमार यादव – २१ विजय
एम.एस. धोनी – २० विजय
टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा मालिकावीर पुरस्कार जिंकण्याच्या बाबतीत सूर्यकुमार यादव संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेत त्याने केलेल्या शानदार कामगिरीसाठी सूर्यकुमार यादवला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला, जो त्याने त्याच्या कारकिर्दीत सहाव्यांदा जिंकला. यासह, सूर्या आता श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगासह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत पहिल्या स्थानी क्रमांकावर विराट कोहली आहे, ज्याने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ७ वेळा प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्कार जिंकला आहे.

