नवी दिल्ली : भारतीय ट्वेन्टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला संघातूनच वगळण्यावर पाचही निवड समिती सदस्यांचे एकमत असताना आता सूर्यकुमारच्या भवितव्याचा निर्णय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या हातात राहणार आहे. सध्याच्या कामगिरीनुसार सूर्यकुमार केवळ फलंदाज म्हणून संघात स्थान मिळवू शकतो की नाही याबद्दल साशंकता असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ सूत्राने सांगितले.

सूर्यकुमार गेल्या वर्षभरापासून लय गमावून बसला आहे. निवड समिती त्याला संघातूनच वगळण्याचा विचार करत आहे. मात्र, संघाच्या कामगिरीत प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्यातील ताळमेळ महत्त्वाचा असतो. गंभीर आणि सूर्यकुमार यांचे चांगले संबंध लक्षात घेता त्याच्या निवडीचा मुद्दा चर्चेत येईल तेव्हा गंभीरची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

ट्वेन्टी-२० विश्वचषक विजेतेपदाची भावनिक लाट ओसरल्यानंतर भविष्याचा विचार करताना निवड समिती सूर्यकुमारला संघातूनच वगळण्याच्या निर्णयापर्यंत आली आहे. सूर्यकुमार ‘आयपीएल’मधूनही आपली लय दाखवू शकलेला नाही. त्यामुळे निवड समितीचे पाचही सदस्य त्याला वगळण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे समजते.

एखादा खेळाडू केवळ फलंदाज म्हणून संघात स्थान मिळवू शकत नसेल, तर तो नेतृत्व कसा करू शकतो, असा प्रश्न निवड समितीने उपस्थित केला आहे. परंतु यासाठी निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे एकमत होणे आवश्यक आहे. गंभीर आणि सूर्यकुमार यांचे संबंध लक्षात

घेता गंभीरने त्याला कर्णधारपदावरून हटविण्यास विरोध केला, तर निवड समितीला आपला निर्णय पुढे ढकलावा लागू शकतो अशी चर्चा खासगीत सुरू आहे.

अन्य पर्याय कोण?

सूर्यकुमारला कर्णधारपदावरून हटवल्यास श्रेयस अय्यर हा या पदासाठी सर्वात प्रबळ उमेदवार असल्याचे मानले जात आहे. पण, त्याच वेळी तो आणि गंभीर एकत्र काम करू शकतील का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. ‘आयपीएल’मधील कामगिरीमुळे शुभमन गिलचे देखील नाव चर्चेत आहे. ‘अ’ संघाचा कर्णधार तिलक वर्मा हादेखील या शर्यतीत असू शकतो असे एक गट म्हणत आहे. मात्र, सध्या भारतीय क्रिकेट पुन्हा एकदा सातत्यपूर्ण कामगिरी, भविष्यातील नियोजन आणि सत्तेची समीकरणे अशा वळणावर उभे राहिले आहे.