देवेंद्र पांडे
टी२० वर्ल्डकपच्या कोलंबोतल्या लढतीदरम्यान पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय भारतीय संघाने घेतला आहे. सर्वसाधारणपणे टॉसच्या वेळी दोन्ही कर्णधार एकमेकांशी हस्तांदोलन करतात. सामना संपल्यानंतर शिष्टाचाराचा भाग म्हणून खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करतात. मात्र भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध यापैकी काहीही करणार नसल्याचं समजतं. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली अघाशी हस्तांदोलन केलं नाही. सामना संपल्यानंतरही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानशी हस्तांदोलन केलं नाही. या भूमिकेवर जोरदार टीकाही झाली आणि अनेकांनी त्याला पाठिंबाही दर्शवला. हीच भूमिका टीम इंडिया टी२० वर्ल्डकपमध्येही कायम राखणार आहे.
पाकिस्तानने टी२० वर्ल्डकपमधल्या भारताविरुद्धच्या लढतीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. आर्थिक नुकसान तसंच अन्य नुकसान आणि आयसीसीच्या मध्यस्थीनंतर पाकिस्तानने भारताविरुद्धची लढत खेळण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा संघ भारतात येणार नसल्यामुळे हा सामना कोलंबोतल्या आर.प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. सामना होणार असला तरी भारतीय संघ या सामन्यात हस्तांदोलन प्रथेचं पालन करणार नाही.
आशिया चषकात हस्तांदोलन न करण्याच्या भारताच्या भूमिकेमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी संतप्त झाले. त्यांनी याप्रकरणी निषेधही नोंदवला. भारतीय संघाने अंतिम लढत जिंकत जेतेपदावर कब्जा केला. मात्र भारतीय संघाने पीसीबीचे चेअरमन आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते जेतेपदाचा करंडक स्वीकारण्यास नकार दिला. स्वत:च्याच हस्ते करंडक सोपवणार यावर नक्वी ठाम राहिले. भारतीय संघानेही भूमिका कायम राखली. सामना संपल्यानंतर सुमारे दीडतास हा तिढा कायम राहिला. अखेर भारतीय संघ जेतेपदाच्या करंडकाविना मायदेशी परतला. आशियाई चषक विजेत्या संघाला देण्यात येणारा करंडक नेमका कुठे आहे आणि तो भारतीय संघाला केव्हा मिळणार याचं ठोस उत्तर अद्यापही कुणाकडेही नाही.
टी२० वर्ल्डकपमधल्या लढतीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याला हस्तांदोलनासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी सूर्यकुमारने भारतीय संघाची नेमकी भूमिका स्पष्ट केली नाही मात्र २४ तासात तुम्हाला कळेलच असं सांगितलं. खेळापेक्षा कोणीाही मोठं नाही याचा त्याने पुनरुच्चार केला. पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली अघानेही यासंदर्भात स्पष्ट काहीही सांगितलं नाही.
बांगलादेशने सुरक्षिततेच्या कारणास्तव टी२० वर्ल्डकपमधून माघार घेतली. आयसीसीने त्यांना निर्णयाचा पुनर्विचार करायला सांगितलं. आमच्या लढती श्रीलंकेत खेळवा अशी मागणी बांगलादेशने केली होती. मात्र आयसीसीने ही मागणी फेटाळली. आम्हाला अन्य गटात खेळवा असंही बांगलादेश बोर्डाचं म्हणणं होतं. मात्र आयसीसीने या मागणीलाही नकार दिला. आयसीसीने निर्णय घ्यायला आणखी एक दिवस दिला. मात्र सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे हे स्पष्ट करत बांगलादेशने स्पर्धेतून माघार घेत असल्याचं स्पष्ट केलं. बांगलादेशऐवजी स्कॉटलंडला संधी देण्यात आलीय. बांगलादेशला फक्त पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा पाठिंबा मिळाला. आयसीसी बैठकीत फक्त पाकिस्तानने बांगलादेशच्या बाजूने कौल दिला होता.

