टी२० प्रकारात सव्वा वर्षांचा अर्धशतकाचा दुष्काळ संपवत भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या लढतीत निर्णायक भूमिका बजावली. न्यूझीलंडने दिलेल्या २०९ धावांचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादवने ३७ चेंडूत ८२ धावांची खेळी केली. विजयानंतर ड्रेसिंगरुममध्ये परतल्यानंतर एका माणसाला वाकून नमस्कार केला. सोशल मीडियावर या नमस्काराची आणि व्हीडिओची प्रचंड चर्चा आहे. सूर्यकुमारने कोणाला केला नमस्कार? जाणून घ्या.

कर्णधार सूर्यकुमारने संघाला जिंकून देणारी खेळी केल्यानंतर थ्रोडाऊन स्पेशालिस्ट रघू यांना वाकून नमस्कार केला. सूर्यकुमारच्या या कृतीने रघू भारावून गेले. त्यांनी आशिर्वाद देत सूर्यकुमारला आलिंगन देत अभिनंदन केलं आणि शुभेच्छाही दिल्या. सूर्यकुमार गेले वर्षभर धावांसाठी झगडताना दिसतो आहे. शुक्रवारी त्याने सव्वा वर्षानंतर अर्धशतकी खेळी साकारली. यादरम्यान अनेकदा सूर्यकुमारला फॉर्मविषयी प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी तो म्हणाला होता की, मी नेटमध्ये खूप चांगला खेळतो आहे. धावा लवकरच होतील. शुक्रवारी सूर्यकुमारने त्याचा प्रत्यय घडवला.

धावा होत नसतानाच्या काळात रघू यांनी सूर्यकुमारला खूप मदत केली आहे. थ्रोडाऊन स्पेशालिस्ट रघू खास मशीनच्या माध्यमातून फलंदाजांना उसळत्या चेंडूंचा सामना करण्यासाठी तयार करतात. अधिकाअधिक वेगाने उसळते चेंडूंचा सराव ते करून घेतात. भारताने आशिया चषक जिंकला होता त्यावेळी युवा तिलक वर्माने करंडक उंचावला. त्यानंतर संघाने करंडक रघू यांच्याकडे सोपवला होता. भारतीय फलंदाजांना स्लिंगरने नेटवर थ्रो-डाउन देणे हे त्याचे काम आहे. रघुशिवाय आणखी दोन जणांची या कामासाठी नियुक्ती झाली आहे.

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने थ्रोडाऊन स्पेशालिस्ट मंडळींचं भरभरून कौतुक केलं होतं. विराट म्हणाला होता की, त्यांच्यामुळेच आम्हा फलंदाजांना सराव मिळतो, लोकांनी या सगळ्यांचे नाव व चेहरे लक्षात ठेवायला हवेत कारण आमच्या यशासाठी ही मंडळी जीवापाड मेहनत घेतात. प्रतिस्पर्धी वेगवान गोलंदाजांविरुद्ध आमची कामगिरी सुधारण्यात रघू यांचा मोलाचा वाटा आहे.

थ्रोडाऊन स्पेशालिस्ट म्हणून भारतीय संघाबरोबर काम करण्याआधी रघू बंगळुरूस्थित नॅशनल क्रिकेट अकादमीचा भाग होते. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी यांनीही रघू यांच्या थ्रोडाऊन्सचा सामना केला आहे. काही वर्षांपूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात खेळत होता. पावसामुळे व्यत्यय आलेल्या लढतीत रघू यांनी संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं होतं. पावसामुळे मैदान ओलसर पट्टे निर्माण झाले होते. खेळाडूंच्या बुटांना माती चिकटत होती. गोलंदाजांना रनअपमध्ये तसंच क्षेत्ररक्षणादरम्यान याचा त्रास होऊ नये म्हणून रघू यांनी सीमारेषेजवळ धाव घेत खेळाडूंचे बूट पुसून दिले.

खरंतर हा रघू यांच्या कामाचा भाग नव्हता पण संघाचं हित ओळखून त्यांनी तातडीने हे काम केलं. सामना संपेपर्यंत खेळाडूंच्या बुटाला लागलेली माती काढून देण्याचं काम त्यांनी चोख बजावलं. यामुळेच भारतीय खेळाडू नीट खेळू शकले आणि त्यांनी संघाला जिंकून दिला. त्यांच्यामुळेच आम्हा फलंदाजांना सराव मिळतो, लोकांनी या सगळ्यांचे नाव व चेहरे लक्षात ठेवायला हवेत कारण आमच्या यशासाठी यांनी खूप मेहनत घेतली आहे.

 रायपूर इथे झालेल्या धावांच्या मैफलीत न्यूझीलंडने भारतीय संघाला २०९ धावांचं आव्हान दिलं. डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात डळमळीत झाली. मत्र त्यानंतर इशान किशनने मनमुराद फटकेबाजी करत दडपण बाजूला सारलं. इशान बाद झाल्यानंतर सूर्यकुमारने सूत्रधाराची भूमिका स्वीकारून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. सूर्यकुमारने ३७ चेंडूत नाबाद ८२ धावांची खेळी करत पुढच्या महिन्यात होणाऱ्या टी२० वर्ल्डकपसाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं. सूर्यकुमारने ९ चौकार आणि ४ षटकारांसह ही खेळी सजवली. या खेळीदरम्यान ठेवणीतला सुपला फटका खेळत लय गवसल्याचं सूर्यकुमारने दाखवून दिलं. या विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. पुढचा सामना २५ जानेवारीला गुवाहाटी इथे होणार आहे.