Suryakumar yadav Bollywood Actress Controversy: भारताचा टी-२० संघ सध्या आगामी टी-२० विश्वचषकाच्या तयारीत व्यस्त आहे. टी-२० विश्वचषक २०२६ येत्या फेब्रुवारीमध्ये होणार आहे. भारतीय संघाचं नेतृत्त्व करण्याची जबाबदारी सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर आहे. सूर्यकुमार यादवचा टी-२० कर्णधार म्हणून उत्कृष्ट रेकॉर्ड राहिला आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली संघाने एकही टी-२० मालिका गमावलेली नाही. पण यादरम्यान आता अभिनेत्रीने सूर्यकुमार यादवबाबत वादग्रस्त वक्तव्य करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
सूर्यकुमार यादवबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारी ही अभिनेत्री आहे, खुशी मुखर्जी. जी सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो, व्हीडिओ तसेच तिच्या विचित्र वक्तव्यांमुळे चर्चेत असते. खुशी मुखर्जीला तिच्या विचित्र फॅशनमुळे अनेकदा ट्रोल केलं गेलं आहे. पण यावेळेस खुशी मुखर्जीने भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवबद्दल धक्कादायक वक्तव्य केलं आहे. तिच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
एका संभाषणादरम्यान खुशी मुखर्जीला विचारण्यात आलं की तिला कोणता क्रिकेटपटू आवडतो आणि तिला कोणाला डेट करायला आवडेल? यावर उत्तर देताना ती म्हणाली, “मला कोणत्याच क्रिकेटपटूला डेट करायचं नाही. अनेक क्रिकेटपटू माझ्या मागे लागले होते. सूर्यकुमार यादव मला खूप मेसेज करायचा, पण आमच्यात आता फारसं बोलणं होत नाही. मला माझं नाव त्याच्याशी किंवा इतर कोणाशी जोडलेलं नकोय.”
खुशी मुखर्जीच्या सूर्यकुमार यादववरील या वक्तव्याचा व्हीडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे. पण सूर्यकुमार यादवने अद्याप यासंबंधित कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. सूर्यकुमार यादव व त्याची पत्नी देविशा शेट्टी यांनी आज मंगळवारी श्री वेंकटेश्वरा स्वामी मंदिर तिरूपतीचं दर्शन घेतलं. वैकुंठ एकादशीनिमित्त सूर्या व देविशाचा मंदिरात दर्शन घेण्यासाठी जातानाचा व्हीडिओ समोर आला होता.
सूर्यकुमार यादव दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी-२० मालिकेत अखेरचा खेळताना दिसला होता. ही मालिका भारताने ३-१च्या फरकाने जिंकली होती. यानंतर आता नव्या वर्षात सूर्यकुमार यादव न्यूझीलंड संघाविरूद्ध पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत खेळताना दिसणार आहे. ही मालिका टी-२० विश्वचषकाच्या सरावाच्या दृष्टीने महत्त्वाची असणार आहे. गतविजेता संघ म्हणून भारतीय संघ टी-२० विश्वचषक २०२६ खेळण्यासाठी उतरणार आहे. २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृ्त्त्वाखाली भारतीय संघाने बार्बाडोस येथे दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं.
