पीटीआय, नवी दिल्ली
भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नावापुढे विश्वचषक विजेता कर्णधार असे बिरुद असले, तरी त्याचे भारतीय संघातील स्थान निश्चितपणे त्याच्या वैयक्तिक कामगिरीवर अवलंबून राहील असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळेच २०२८ लॉस एंजिलिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी त्याच्या समावेशाविषयी निश्चितपणे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याचवेळी आगामी आयर्लंड दौर्‍यासाठी निश्चित करण्यात आलेल्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीला स्थान देण्यात आले आहे.

यावर्षी जून-जुलैमध्ये होणारा भारताचा इंग्लंड आणि आयर्लंड दौरा कर्णधार सूर्यकुमारसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. कारण या वेळी त्याच्या नेतृत्वापेक्षा त्याच्या फलंदाजीची अधिक कडक छाननी केली जाईल असेच मानले जात आहे. दोन वर्षांनी २०२८ मध्ये होणारे ऑलिम्पिक आणि ऑस्ट्रेलियातील ट्वेन्टी-२० विश्वचषक यांसारख्या मोठ्या स्पर्धांच्या पुढील टप्प्यापर्यंत त्याला आणखी दोन वर्षे संधी द्यायची की नाही, याचा निर्णय या दौर्‍यातील कामगिरीवरून घेतला जाऊ शकतो.

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सूर्यकुमारलाच अजूनही पहिली पसंती दिली आहे. गंभीर यांचा कार्यकाळ २०२८ च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकापर्यंत वाढवला जाण्याची शक्यता आहे. मात्र, अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती गंभीर यांच्या मताशी सहमत होईल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. कारण ऑलिम्पिकच्या वेळी सूर्यकुमार ३८ वर्षांचा असेल.

सूर्यकुमार सध्या संघाचे नेतृत्व करत असला तरी, एक फलंदाज म्हणून त्याला त्याच्या कामगिरीत सातत्य राखणे आवश्यक आहे. तो इंग्लंड दौर्‍यावर नक्कीच नेतृत्व करेल, परंतु त्यानंतर २०२८ पर्यंतच्या पुढील चर्चा केवळ त्याच्या वैयक्तिक कामगिरीवर आधारित असतील, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील (बीसीसीआय) एका अधिकार्‍याने नाव न देण्याच्या अटीवर सांगितले.

सूर्यकुमारसाठी २०२५ हे वर्ष अत्यंत खराब राहिले होते, त्याचा स्ट्राईक रेट १२० पेक्षा कमी झाला होता आणि त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नव्हते. चालू वर्षांत हे चित्र बदलले आणि त्याने ट्वेन्टी-२० विश्वचषकापर्यंत १६० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने चार अर्धशतके ठोकली. मात्र, ट्वेन्टी-२० विश्वचषकात अमेरिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्याचा अपवाद वगळता सूर्यकुमारला कोणतीही उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही. मोठ्या संघांविरुद्ध त्याची धावसंख्या निराशाजनक होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १८, वेस्ट इंडिजविरुद्ध १८, इंग्लंडविरुद्ध (उपांत्य फेरी) ११ आणि न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात तो शून्य धावांवर बाद झाला.

अडचण कुठे

भारतीय संघात पहिल्या तीन क्रमांकावर स्फोटक फलंदाजांची फौज आहे. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन हे चांगल्या लयीत खेळत आहेत. त्याचवेळी वैभव सूर्यवंशीसारखा युवा खेळाडू संधीच्या प्रतीक्षेत आहे. सूर्यकुमारसाठी हीच सर्वात अडचणीची बाब आहे. अशा स्थितीत संघात स्वत:चे स्थान टिकवून ठेवण्यासाठी सूर्यकुमारला सातत्यपूर्ण कामगिरी करणे गरजेचे आहे.