Suryakumar Yadav Welcome in Mumbai Video: कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने मायदेशात टी-२० विश्वचषक २०२६ चं जेतेपद जिंकलं. अहमदाबादमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंड संघाचा तब्बल ९६ धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने विक्रमी तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाचं जेतेपद पटकावलं आहे. या विजयानंतर संघाने एकत्र वर्ल्डकप जिंकल्याचा आनंद साजरा केला आणि सर्व खेळाडू आपआपल्या घरी परतले आहे. यादरम्यान सूर्यकुमार यादवचं घरी परतल्यानंतर खास स्वागत करण्यात आलं, ज्याचा व्हीडिओ समोर आला आहे.

सूर्यकुमार यादव हा भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणारा तिसरा कर्णधार ठरला. सूर्या मुंबईत चेंबूरमध्ये राहतो. चेंबूरमध्ये पोहोचल्यानंतर सर्वात आधी त्याचं औक्षण करण्यात आलं, यानंतर शाल व फुलं देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. सूर्याचं ढोलताश्यांच्या गजरात स्वागत करण्यात आलं होतं.. सूर्याच्या या स्वागताचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. सूर्याचं स्वागत करण्यासाठी अनेक चाहते उपस्थित होते. कोणी सूर्याबरोबर फोटो काढत होते, तर कोणी सूर्याचा बॅटवर ऑटोग्राफ घेताना दिसले.

सूर्याने वर्ल्डकप विजयानंतर पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “देशासाठी टी-२० विश्वचषक जिंकून छान वाटतंय. २०२४ आणि आता २०२६ मध्ये लागोपाठ ट्रॉफी जिंकून छान वाटतंय. २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर हेच ठरवलं होतं की मायदेशात जेव्हा टी-२० विश्वचषक होईल तो जिंकला तर आनंदाची गोष्ट असेल. आता संघाचं पुढचं लक्ष्य भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून हे असेल. सध्याच्या घडीला भारतीय संघ चांगल्या लयीत आहे. त्यामुळे देशासाठी सर्वाधिक ट्रॉफी जिंकून देण्याचा माझा भविष्यात प्रयत्न असेल.’

सूर्यकुमार यादव मुंबईत राहत्या घरी परतल्यानंतर मराठीत काय म्हणाला?

यादरम्यान मराठी वृत्तवाहिन्यांशी संवाद साधताना सूर्या मराठीत बोलताना दिसला. सूर्या यादरम्यान म्हणाला, “चेंबूरपासून क्रिकेट प्रवासाला सुरूवात झाली होती आणि आता टी-२० विश्वचषक जिंकून इथे येऊन छान वाटतंय. भारतात वर्ल्डकप जिंकलो यामुळे अजून छान वाटतंय.” यादरम्यान पुढची रणनिती काय असेल असं विचारल्यानंतर सूर्या म्हणाला, “आता घरी जाणार जेवणार आणि दोन दिवस मस्त झोपणार” असं सूर्याने मजेत म्हटलं.