Suryakumar Yadav & Wife Blessed with Baby Girl: भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देविशा शेट्टी यांच्या घरी गुरुवारी नव्या पाहुण्याचं आगमन झालं. सूर्यादादाच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं असून संपूर्ण कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. सूर्या आणि देविशा लग्नाच्या १० वर्षांनंतर आई-बाबा झाले आहेत. आयपीएल २०२६ हंगामात सूर्यकुमार यादवचा फॉर्म अपेक्षेप्रमाणे नसल्याने त्याच्यासाठी हा काळ मैदानावर आव्हानात्मक ठरत होता. मात्र, अशा कठीण काळात मुलीच्या जन्मामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यात आनंदाचा आणि खास क्षण आला आहे.

ही आनंदाची बातमी सर्वप्रथम ‘द टाइम्स ऑफ इंडिया’च्या एका पत्रकाराने एक्सवर शेअर केली. सूर्यकुमार यादव आणि देविशा शेट्टी यांना कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल त्याने शुभेच्छा दिल्यानंतर चाहत्यांसह क्रिकेटविश्वातूनही अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. यानंतर आता खुद्द सूर्यकुमार यादवने फोटो शेअर केला आहे.

सूर्या दादा देविशा शेट्टी झाले मुलीचे आई-बाबा

सूर्याच्या या फोटोमध्ये त्याचा, पत्नीचा आणि लेकीचा हात पकडलेला दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, “खळखळत्या हास्यासोबत, नव्या स्वप्नांच्या सुरुवातीसह आणि आनंदाच्या क्षणांना कवेत घेत आम्ही आमच्या चिमुकल्या परीचं स्वागत करत आहोत.”

सूर्यकुमार आणि देविशा यांनी २०१६ मध्ये विवाह केला होता आणि भारतीय क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आता त्यांच्या आयुष्यातील या नव्या प्रवासासाठी सोशल मीडियावर चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छा आणि प्रेम व्यक्त केलं जात आहे. सूर्यादादाने शेअर केलेल्या या पोस्टवर शिखर धवन, दीपक चहर या खेळाडूंनी कमेंट केली आहे. याशिवाय सारा तेंडुलकर आर अश्विनची पत्नी प्रिती नारायण यांनी देखील नव्या पालकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

देशांतर्गत क्रिकेटमधील नियमित खेळाडूपासून भारताच्या सर्वात मोठ्या टी-२० स्टार्सपैकी एक आणि आता राष्ट्रीय टी-२० संघाचा कर्णधार होईपर्यंतच्या सूर्यकुमारच्या प्रवासात देविशा शेट्टी कायम त्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे. सोशल मीडियावरील उपस्थितीमुळेही हे जोडपं चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. देविशा अनेकदा सूर्यकुमारसोबत दौरे आणि आयपीएल हंगामात प्रवास करताना दिसते आणि आता आयपीएलच्या गोंधळात तसेच मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफच्या लढाईदरम्यान यादव कुटुंबाला आनंद साजरा करण्यासाठी एक खास आणि सुंदर कारण मिळालं आहे.