Suryakumar Yadav Mumbai Indians: आयपीएल २०२६ स्पर्धा सुरु होण्याआधी भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळताना आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत जेतेपदाचा मान पटकावला होता. पण आयपीएल झाल्यानंतर त्याला भारतीय टी-२० संघाच्या कर्णधारपदावरुन काढून टाकण्यात आलं आहे. यासह त्याला भारतीय संघातील स्थान देखील गमवावं लागलं आहे. बीसीसीआयने आयर्लंड आणि इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात सूर्यकुमार यादवला स्थान देण्यात आलेलं नाही. भारतीय संघातून बाहेर झाल्यानंतर आता सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स संघाचीही साथ सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे.

सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्सकडून खेळताना आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर तो कोलकाता नाईट रायडर्सचा भाग बनला. २०१८ पासून तो मुंबई इंडियन्ससाठी मुख्य फलंदाजाची भूमिका पार पाडत आहे. भारतीय संघातून बाहेर पडल्यानंतर त्याने मुंबई इंडियन्सची साथ सोडणार असल्याचे संकेत दिले आहेत. सूर्यकुमार यादवने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम आणि एक्स अकाऊंटवरुन मुंबई इंडियन्सला अनफॉलो केलं आहे. यासह मुंबई इंडियन्सचे सर्व पोस्ट देखील डिलीट केले आहेत. त्यामुळे सूर्यकुमार यादव आता आगामी हंगामाआधी मुंबई इंडियन्सची साथ सोडणार की काय? अशी चर्चा रंगली आहे.

सूर्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना केली होती. त्यानंतर तो कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग बनला. २०१८ मध्ये मुंबईने त्याला १६.२५ कोटी रूपयांची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं. मुंबईची साथ सोडल्यानंतर सूर्यकुमार यादव कोणत्या संघाकडून खेळणार? अशी चर्चा रंगली आहे. माध्यमातील वृत्तानुसार, सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना दिसून येऊ शकतो. कोलकाता नाईट रायडर्सला मधल्या फळीत फलंदाजी करणारा विश्वासू फलंदाज हवा आहे. यासह कर्णधार देखील हवा आहे. काही दिवसांपूर्वीच हार्दिक पंड्या मुंबईची साथ सोडणार असल्याची चर्चा रंगली होती. आता जर सूर्या देखील मुंबईची साथ सोडून जाणार असे, तर मुंबईचा संघ आणखी कमकुवत होऊ शकतो.

आयपीएल २०२६ स्पर्धेत सूर्यकुमार यादवला नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. या हंगामात त्याने १३ सामन्यांमध्ये २०.७७ च्या सरासरीने २७० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याला २ अर्धशतकं झळकावता आले आहेत. यादरम्यान ६० धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. आतापर्यंत झालेल्या १७९ सामन्यांमध्ये त्याने ३३.९३ च्या सरासरीने ४५८१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३१ अर्धशतकं आणि २ शतकं झळकावले आहेत. नाबाद १०३ धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.