नवी दिल्ली : मुंबईचा वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू सूर्यांश शेडगेला आगामी न्यूझीलंड दौर्यातील एकदिवसीय क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. अलीकडेच झालेल्या ‘अ’ संघांतील मालिकेत सूर्यांशने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमकदार कामगिरी केली. त्यामुळे निवड समिती त्याला प्रथमच एकदिवसीय संघात स्थान देण्याबाबत विचार करत असल्याचे समजते.
शेडगेने काही महिन्यांपूर्वीच आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करताना अनुक्रमे आयर्लंड, इंग्लंड आणि झिम्बाब्वे संघांविरुद्ध एकेक ट्वेन्टी-२० सामना खेळला. त्यानंतर त्याला पायाच्या दुखापतीचाही सामना करावा लागला. मात्र, त्यातून सावरत स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना त्याने ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध पुदुच्चेरी येथे झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांत भारत ‘अ’ संघाकडून प्रभावी कामगिरी केली.
या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात शेडगेने अचूक सीम गोलंदाजीच्या जोरावर चार बळी मिळवले, तर अखेरच्या सामन्यात फलंदाजीत ६६ धावांची खेळी करत भारत ‘अ’ संघाला विजयी केले. त्यामुळे त्याने भारताच्या एकदिवसीय संघातील स्थानासाठी आपली दावेदारी भक्कम केली आहे. त्यातच दुखापतीमुळे हार्दिक पंड्याची अनुपस्थिती आणि कार्यभार व्यवस्थापनामुळे नितीश कुमार रेड्डीला काही सामन्यांसाठी विश्रांती मिळण्याची शक्यता, याचाही शेडगेला फायदा मिळू शकेल.
‘‘नितीश कुमार रेड्डी कसोटी संघासाठीही महत्त्वाचा खेळाडू आहे. तो वेगवान गोलंदाजी करण्यासह फलंदाजीतही योगदान देऊ शकतो. त्यामुळे तो सर्व एकदिवसीय सामने खेळणार नाही. त्याला लाल चेंडूच्या सरावाला प्राधान्य द्यावे लागेल. या परिस्थितीत शेडगेला एकदिवसीय संघात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे,’’ असे ‘बीसीसीआय’मधील सूत्राकडून सांगण्यात आले.
शेडगेने देशांतर्गत एकदिवसीय (लिस्ट-ए) क्रिकेटमध्ये १८ सामने खेळले असून फलंदाजीत दोन अर्धशतकांसह ३३७ धावा करतानाच गोलंदाजीत १६ बळी मिळवले आहेत. अलीकडच्या काळात त्याने गोलंदाजीत मोठी सुधारणा करत प्रज्ञान ओझाच्या अध्यक्षतेखालील निवड समितीचे लक्ष वेधून घेतले आहे.
कसोटीपटूंना एकदिवसीय मालिकेत विश्रांती?
भारतीय संघ न्यूझीलंड दौर्याची सुरुवात पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेने करणार आहे. त्यानंतर उभय संघांत पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाईल. ट्वेन्टी-२० सामन्यांना २२ ऑक्टोबर, तर एकदिवसीय सामन्यांना ४ नोव्हेंबरपासून प्रारंभ होईल. मग १९ नोव्हेंबरपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. अखेरचा एकदिवसीय सामना आणि पहिला कसोटी सामना यात केवळ चार दिवसांचे अंतर आहे. त्यामुळे कसोटी संघातील काही प्रमुख खेळाडूंना एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांसाठी विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, एकदिवसीय संघात नितीश कुमार रेड्डीच्या जागी शेडगेला संधी मिळू शकते.
