IND vs IRE Team India Squad: मुंबईकर सूर्यांश शेडगेची आयर्लंडविरूद्ध टी-२० मालिकेसाठी संघात निवड करण्यात आली आहे. भारताचा आयर्लंड दौरा सुरू होण्यापूर्वी पुन्हा एकदा भारतीय संघात मोठा बदल झाला आहे. श्रीलंकेच्या दौऱ्यावर भारत अ संघात खेळल्या गेलेल्या त्रिकोणी मालिकेत चमकदार कामगिरी करणाऱ्या सूर्यांश शेडगेला भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ आजच रवाना झाला आहे.

बीसीसीआयने नितीश कुमार रेड्डीच्या जागी बदली खेळाडूची घोषणा केली आहे. सूर्यांश शेडगे हा नितीश रेड्डीचा अगदी लाईक अ लाईक रिप्लेसमेंट म्हणता येईल. नितीश कुमार रेड्डीप्रमाणेच सूर्यांश शेडगे हा देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे, जो वेगवान गोलंदाज आणि फलंदाज आहे. सूर्यांश शेडगे आयर्लंड दौऱ्यासोबतच इंग्लंडमध्ये होणाऱ्या टी-२० आणि वनडे मालिकेसाठीही भारतीय संघासोबत असेल.

अष्टपैलू खेळाडू असलेला सूर्यांश शेडगे नुकताच श्रीलंकेत झालेल्या तिरंगी मालिकेत भारत अ संघाकडून खेळताना दिसला. त्याने पाच सामन्यांत एकूण १४७ धावा केल्या; यात त्याने सहा षटकार आणि सहा चौकार लगावले असून त्याची सर्वोच्च धावसंख्या ७२ होती. या स्पर्धेत सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत वैभव सूर्यवंशीनंतर सूर्यांश दुसऱ्या क्रमांकावर होता. फलंदाजीतील आपल्या प्रभावी कामगिरीव्यतिरिक्त, त्याने या मालिकेत दोन बळीही घेतले.

२०२४-२५ मधील सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत मुंबईच्या विजयी मोहिमेदरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी सूर्यांश शेडगे एक होता; त्याने मधल्या फळीत फलंदाजी करताना २५१.९२ च्या स्ट्राईक रेटने १३१ धावा केल्या. आयपीएल २०२६ मध्ये सूर्यांश शेडगे पंजाब किंग्स संघाचा भाग होता. त्याने यंदाच्या मोसमात पंजाबसाठी अनेक कमालीच्या खेळी केल्या. आयपीएलदरम्यानही सूर्यांश चर्चेत आला होता; त्याने पंजाब किंग्ससाठी ७ सामने खेळताना १७५ हून अधिकच्या स्ट्राईक रेटने १५८ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये १२ षटकारांचा समावेश होता.

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारताचा सुधारित संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), सूर्यांश शेडगे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी, प्रसीध कृष्णा, वरुण चक्रवर्ती.