Suryakumar Yadav Gesture Wins Hearts: अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करून इतिहास घडवला. टीम इंडिया टी-२० विश्वचषक विजेतेपद सलग दुसऱ्यांदा जिंकणारा पहिला संघ ठरला. तसेच घरच्या मैदानावर संघाने टी-२० विश्वचषक विजेतेपद जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती. टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघ जल्लोष करत असताना सूर्याने मात्र खेळपट्टीचे आभार मानले.

अंतिम सामन्यात, प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकांत पाच गडी गमावून २५५ धावा केल्या. प्रत्युत्तरात, किवी संघ १९ षटकांत १५९ धावांवर सर्वबाद झाला. टी२० विश्वचषक फायनलमध्ये धावांच्या बाबतीत हा सर्वात मोठा विजय आहे. भारताच्या टॉप तिन्ही फलंदाजांनी अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. यानंतर गोलंदाजीत अक्षर पटेल जसप्रीत बुमराह यांनी एकत्र ७ विकेट्स घेत संघाच्या विजयाचा कळस चढवला.

बुमराहने १८व्या षटकात मिचेल सँटनरला क्लीन बोल्ड करत नववी विकेट मिळवली. यानंतर १९व्या षटकात अभिषेक शर्मा गोलंदाजीला आला. त्याच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर विकेट मिळाल्याने न्यूझीलंड सर्वबाद झाला आणि अहमदाबादच्या मैदानावर विजयाचा जल्लोष सुरू झाला. सर्व जणांनी एकत्र गळाभेट करत जल्लोष केल्यानंतर सूर्या अचानक त्या विजयी घोळक्यात बाहेर आला.

सूर्यकुमार यादवने मैदानाची माती डोक्याला लावत मानले आभार, कृतीने जिंकली सर्वांची मनं

सूर्याने घोळक्यातून बाहेर येत खाली वाकला. त्याने अहमदाबादच्या पिचवर हात फिरवला आणि ती माती त्याने आपल्या डोक्याला लावत त्या खेळपट्टीचे आभार मानले. सूर्याच्या या कृतीने सर्वांचं लक्ष वेधलं. रोहित शर्माने बार्बाडोसमधील विजयानंतर खेळपट्टीच्या मातीची चव चाखली होती. तर सूर्याने आता खेळपट्टीची माती डोक्याला लावत त्याचे आभार मानले.