बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने रविवारी (१४ जून) मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तो ३४ वर्षांचा होता. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत त्याने त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. २०१३ मध्ये ‘काइ पो चे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण लॉकडाउन काळात त्याला काही घटनांमुळे नैराश्य आलं आणि त्यातून त्याने आत्महत्येचा पर्याय स्वीकारला, अशी चर्चा सध्या सिनेवर्तुळात आहे.

सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केल्यानंतर साऱ्यांनाच धक्का बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते क्रीडा आणि मनोरंजन विश्वातून त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली. सुशांतच्या ‘छिछोरे’ चित्रपटातील भूमिकेची विशेष चर्चा रंगली. या चित्रपटात त्याने, ‘आत्महत्या हा कोणत्याही समस्येवर तोडगा नसतो. आपण त्या परिस्थितीचा सामना केला पाहिजे आणि जगत राहिले पाहिजे’, असा संदेश दिला होता. पण दुर्दैवाने सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे.

Sushant Singh Rajput

सुशांतच्या आत्महत्येमुळे भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत यालाही धक्का बसला होता. श्रीसंतने स्वत: याबद्दल माहिती दिली. तसेच, तो स्वत: नैराश्यात असतानाचा अनुभवही त्याने सांगितला. “मी त्या काळात (मॅच फिक्सिंग प्रकरणानंतर) खूप घाबरून गेलो होतो. मला घराबाहेर पडायलाही भीती वाटत होती. मी माझ्या घरातील इतर मंडळींनाही घराबाहेर जाऊन देत नव्हतो. कारण मला किंवा त्याना कोणीतरी किडनॅप करेल अशी मला कायम भीती वाटायची. मी खूप जास्त नैराश्यात होतो. खोलीत असताना मला अनेक वाईट विचार यायचे पण मी खोलीबाहेर येताना चेहऱ्यावर हसू ठेवायचो. तसे केले नसते तर माझे आई-बाबा मला सांभाळू शकले नसते, कारण मी मानसिकदृष्ट्या दुबळा होत चाललो आहे हे मी त्यांना दाखवून देऊ शकत नव्हतो”, असे त्याने डेक्कन क्रोनिकलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

“मी नैराश्यात असताना आत्महत्येचा विचार माझ्या मनात आला होता, मी अगदी आत्महत्येच्या विचाराच्या काठावर पोहोचलोदेखील होतो, पण नंतर आप्तेष्टांचा विचार करून मी आत्महत्येचा निर्णय रद्द केला. कदाचित म्हणूनच मला सुशांतच्या आत्महत्येच्या बातमीमुळे खूप त्रास झाला”, असे श्रीसंतने स्पष्ट केले.