सोनीपतला होणाऱ्या विशेष ऑलिम्पिक  सराव शिबिरातून वगळले

रिओ ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे सुशील कुमारचे स्वप्न मावळण्याच्या मार्गावर आहे. भारतीय कुस्ती महासंघाने रिओसाठी निवड झालेल्या खेळाडूंसाठी सराव शिबिराचे आयोजन केले आहे. मात्र या यादीतून सुशील कुमारला डच्चू देण्यात आला आहे. पात्रता स्पर्धेद्वारे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या कुस्तीपटूंनाच या शिबिरासाठी निवडण्यात आले आहे.

गेल्या वर्षी झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेद्वारे नरसिंग यादवने ७४ किलो वजनी गटात फ्रीस्टाइल प्रकारात ऑलिम्पिकवारी पक्की केली होती. त्यानुसार नरसिंगची शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत खेळू न शकलेल्या सुशील कुमारची निवड करण्यात आलेली नाही. बुधवारपासून या शिबिराला सुरुवात होत आहे. सुशीलची इच्छा असल्यास तो शिबिरात सहभागी होऊ शकतो, असे कुस्ती महासंघाने स्पष्ट केले आहे.

रिओवारीपूर्वी सराव मिळावा म्हणून शिबिरात प्रत्येक वजनी गटात एकापेक्षा अधिक कुस्तीपटूंना समाविष्ट करण्यात आले आहे. साथीदाराची निवड करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक कुस्तीपूटला देण्यात आले आहे. दरम्यान, रिओवारीसाठी सुशील कुमार आणि नरसिंग यादव यांच्यादरम्यान निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्याचे कोणतेही निर्देश क्रीडा मंत्रालयाने दिलेले नाहीत, असे कुस्ती महासंघाने स्पष्ट केले. सुशील आणि नरसिंगदरम्यान निवड चाचणी झाल्यास अन्य वजनी गटांतील कुस्तीपटूही अशाच स्वरुपाची मागणी करतील अशी भीती कुस्ती महासंघाला आहे.

सुशील कुमारने रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय संघात समावेश व्हावा, यासाठी क्रीडा मंत्रालय, भारतीय ऑलिम्पिक समिती आणि पंतप्रधानांकडे धाव घेतली होती. मात्र नियमानुसार नरसिंगने ऑलिम्पिकसाठीचा निकष पार केल्याने त्यालाचा प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.