वृत्तसंस्था, चॅटॅरॉक्स
उपाशी पोटी आणि हृदयाच्या वाढलेल्या ठोक्यांसह धैर्याने अतुलनीय कामगिरी करत महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्निल कुसळेने भारताला पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील तिसरे पदक मिळवून दिले. ऑलिम्पिक पदार्पणात कोल्हापूरच्या स्वप्निलने फार अवघड मानल्या जाणाऱ्या ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारात कांस्यपदकाची कमाई करतानाच इतिहास रचला. नेमबाजीच्या या प्रकारात ऑलिम्पिक पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय ठरला.
तसेच महाराष्ट्रासाठीही हे पदक खास ठरले. १९५२ हेलसिंकी ऑलिम्पिकमधील खाशाबा जाधव यांच्या कुस्तीतील कांस्यपदकानंतर ७२ वर्षांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला ऑलिम्पिक पदकवीर गवसला. गुरुवारी झालेल्या अंतिम फेरीत स्वप्निलने ४५१.४ गुणांसह तिसरे स्थान पटकावले. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीतील हे भारताचे तिसरे पदक ठरले.
हेही वाचा >>>PV Sindhu : पी.व्ही.सिंधूला पराभवाचा धक्का; ऑलिम्पिक पदकांची हॅट्ट्रिक हुकली, बिंग जियाओने घेतला बदला
संयम निर्णायक
आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीत स्वप्निलसमोर विश्वविक्रमवीर चीनचा लिऊ युकुन आणि जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला चेक प्रजासत्ताकचा जिरी प्रिवरातस्की आदींचे आव्हान होते. लिऊने अपेक्षित कामगिरी करताना ४६३.६ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. युक्रेनचा सेरी कुलिश (४६१.३) रौप्यपदकाचा मानकरी ठरला. त्यानंतर तिसऱ्या स्थानासाठी स्वप्निल आणि जिरी प्रिवरातस्की यांच्यात स्पर्धा सुरू होती. अखेर स्वप्निलने राखलेला संयम निर्णायक ठरला. स्वप्निलने ४५१.४ गुणांसह कांस्यपदक मिळवले. तो एकवेळ सहाव्या स्थानापर्यंत घसरला होता. परंतु त्याने कलामीची जिद्द दाखवली.
ऑलिम्पिकमध्ये रायफल थ्री-पोझिशन प्रकारात पदक जिंकणारा स्वप्निल भारताचा पहिलाच नेमबाज आहे. याआधी २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत ५० मीटर ‘प्रोन’ (पोटावर झोपून वेध साधणे) प्रकारात जॉयदीप कर्माकर चौथा आला होता. पुढे ऑलिम्पिकमधून ५० मीटर ‘प्रोन’ हा प्रकार वगळण्यात आला आणि त्याची जागा थ्री-पोझिशन प्रकाराने घेतली. थ्री-पोझिशन प्रकारात मांडीवर बसून (नीलिंग), मग पोटावर झोपून (प्रोन) आणि शेवटी उभे राहून (स्टँडिंग) वेध घेतला जातो.
© The Indian Express (P) Ltd