मॉन्टेरी (मेक्सिको) : यासीन अयारीने केलेल्या दोन गोलच्या जोरावर स्वीडनने २०२६ च्या विश्वचषकात आपला दबदबा निर्माण करताना ‘फ’ गटातील सामन्यात ट्युनिशियाचा ५-१ असा पराभव केला. या मोठ्या विजयासह स्वीडनने गटात गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. स्वीडनच्या या विजयात अलेक्झांडर इसाक आणि व्हिक्टर ग्योकेरेस यांनी प्रत्येकी एक गोल करण्यासह एका गोलसाठी सहाय्य केले.
अन्य एक गोल मथायस स्वानबर्गने नोंदवला. जागतिक क्रमवारीत ३९ व्या स्थानावर असलेला स्वीडनचा संघ २०२२ च्या विश्वचषकासाठी पात्र ठरू शकला नव्हता. दुसरीकडे, ट्युनिशियासाठी ओमर रेकिकने एकमेव गोल केला.
वडिलांच्या देशाबद्दल आदर
पहिल्या गोलनंतर अयारीने जास्त जल्लोष केला नाही; त्याने ट्युनिशियाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी फक्त आपले हात वर केले, कारण त्याच्या वडिलांचा जन्म ट्युनिशियामध्ये झाला आहे.
