जलतरणपटूंसाठी निर्माण करण्यात आलेल्या तरणतलावाला सरकारी अनास्थेमुळे कशी भग्नावस्था येऊ शकते याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे चेंबूरमधील जनरल अरुणकुमार वैद्य तरणतलाव. मुंबई महानगरपालिकेच्या मोजक्या तरणतलावपैकी एक असलेला हा तरणतलाव गेली सहा वर्षे उद्ध्वस्त धर्मशाळेप्रमाणे अखेरच्या घटका मोजत आहे. या तरणतलावाची देखरेख ठेवणारे शासकीय कर्मचारी मात्र ऑलिम्पिकच्या धर्तीवर तरणतलावाची निर्मिती करण्यात येईल, अशी आश्वासने देत आहेत.
चेंबूर रेल्वे स्थानकापासून नजीकच हा महानगरपालिकेचा तरणतलाव आहे. तरणतलावाच्या एका बाजूला भूगर्भातून येणारे पाणी आणि संपूर्ण इमारतीला असलेला गळतीचा धोका यामुळे २००७मध्ये हा तरणतलाव बंद करण्यात यावा, असा आदेश अतिरिक्त आयुक्तांनी सभासदांसाठी दिला. यानंतर या तरणतलावाच्या नूतनीकरणासाठी प्रस्ताव सादर करण्यात आले, निधी मंजूर करण्यात आला, मात्र काम कधीच सुरू झाले नाही. सजग नागरिकांनी आवाज उठवत तरणतलावाला झळाळी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले, मात्र तेही अपुरे ठरले.
या तरणतलावाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच पाण्याचे मोठे डबके साचलेले आहे. त्यातून वाट काढत आत गेल्यावर लोखंडी फाटक लागते. त्या गलिच्छ पाण्यातून वाट काढल्यावर तरणतलावाची वास्तू दिसते. वास्तूत प्रवेश करताना डाव्या हाताला तरणतलावाच्या जन्मदिनाची अर्थात २ एप्रिल १९९३ उद्घाटनाची कोनशिला नजरेस पडते. आतमध्ये प्रवेश केल्यावर एखाद्या अंधाऱ्या, एकाकी, जुनाट हवेलीत शिरल्यासारखे वाटते. इथली प्रत्येक भिंत गळकी आहे, त्यामुळे तुम्हाला पाण्यातूनच वाटचाल करावी लागते. सगळ्या भिंतींतून पाणी झिरपत असल्याने शॉर्टसर्किटची भीती आहे, त्यामुळे इथला वीजपुरवठाही बंद ठेवण्यात येतो. तलावात शेवाळ पसरले आहे. एका भागात तर जमिनीतून काळे दूषित पाणी येताना दिसते. जलतरणपटूंना उडी मारण्यासाठी केलेली रचना आणि समोर प्रेक्षकांसाठी तयार केलेली गॅलरी दोन्ही खंगलेल्या अवस्थेत आहे. या जागेवर अन्य सरकारी विभाग तसेच खाजगी बिल्डर्सचा डोळा असल्याने जाणीवपूर्वक नूतनीकरणाची प्रक्रिया लांबणीवर पडल्याचीही चर्चा आहे.

वास्तूच्या नूतनीकरणाची योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे. यानुसार ऑलिम्पिक आकाराचा तरण तलाव, व्यायामशाळा, उपाहारगृह, वाहनतळ असे अद्ययावत संकुल उभारण्यात येणार आहे. तरण तलाव बंद झाल्याने सदस्यांना घाटकोपर, दादर अशा अन्य ठिकाणी पोहण्याची परवानगी देण्यात आली आहे.’’
संजय शिंदे, प्रभारी व्यवस्थापक

कर्मचारीही असुरक्षित
तरणतलाव आणि या वास्तूच्या व्यवस्थापनासाठी दहा जणांचा चमू कार्यरत आहे. मात्र ही सगळी मंडळी जीव धोक्यात घालून काम करतात. भिंत न् भिंत गळकी असल्याने पायाखाली पाणीच. त्यातच शॉर्टसर्किटच्या भीतीमुळे वीजपुरवठाही खंडित करावा लागतो. तरणतलाव आणि वास्तूचा परिसर विस्तीर्ण आहे. शुद्धीकरण प्रकल्प, तरणतलाव, बगीचा अशा विस्तारलेल्या परिसराची निगा राखणे कठीण आहे. पण तरीही ही मंडळी हे काम नेटाने करतात. ‘‘आम्ही अशा असुरक्षित वातावरणात काम करतो, कधीही काहीही होऊ शकते असे घरच्यांना सांगूनच आम्ही निघतो,’’ असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.